रोटरी दिव्यांग सेंटरसाठी मॅरेथॉनद्वारे उभारला जातोय निधी
कल्याण दि.5 ऑक्टोबर :
ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित मॅरेथॉन स्पर्धा म्हणून देशभरातील धावपटूंच्या मनात मानाचे स्थान मिळवलेल्या रोटरी कल्याण मॅरेथॉनच्या स्पर्धक नोंदणीला प्रोमो रनद्वारे आजपासून प्रारंभ झाला. ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील अनेक नामांकित धावपटूंसह दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले धावपटूही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आजच्या घडीला भारतामध्ये होणाऱ्या 20 प्रमूख मॅरेथॉन स्पर्धांमध्ये कल्याणातील या स्पर्धेचाही समावेश झाला आहे. (Rotary Kalyan Marathon; Participant registration begins through promo run)
रोटरी क्लबतर्फे कल्याण पश्चिमेत रोटरी दिव्यांग सेंटर उभारण्यात आले असून त्याद्वारे आजपर्यंत शेकडो दिव्यांग लोकांना मोफतपणे कृत्रिम पाय, हात बसवण्यात आले आहेत. या दिव्यांग सेंटरसाठी लागणारा निधी मॅरेथॉनच्या माध्यमातून उभा केला जात असून येत्या 23 नोव्हेंबर 2025 रोजी ही रोटरी मॅरेथॉन होणार आहे. या मॅरेथॉनची जोरदार तयारी सुरू असून 3, 5, 10, 21 आणि 42 किलोमीटर अशा विविध गटांमध्ये होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा 6 वे वर्षे असून त्यामध्ये सहभागी स्पर्धकांची संख्या दर वर्षागणिक वाढत चालली आहे. या मॅरेथॉनमधील स्पर्धक नोंदणीची सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रोमो रनद्वारे करण्यात आली. तसेच त्यानंतर अनेक मायवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनच्या टी शर्टचेही अनावरण केले गेले.
या स्पर्धेसाठी रस्ते आणि लाईटची उत्तम व्यवस्था ठेवण्याबाबत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून आश्वस्त करण्यात आले आहे. त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह प्रशासनाचेही आभार मानण्यात आले. तसेच कल्याण डोंबिवलीतील धावपटूंचा यावेळी सन्मानही करण्यात आला. तर या मॅरेथॉनसाठी केडीएमसीच्या माध्यमातून चांगले सहकार्य उपलब्ध करून देत असल्याबद्दल केडीएमसीचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनाही गौरवण्यात आले.
यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या कॉम्रेड मॅरेथॉनमधील सर्वात वेगवान भारतीय धावपटू देव चौधरी, कॉम्रेड मॅरेथॉन तब्बल 14 वेळा पूर्ण करणारे नामांकित धावपटू सतीश गुजराण, सुप्रसिद्ध महिला धावपटू गीतांजली लेंका आणि मराठमोळा राष्ट्रीय धावपटू अनिल कोर्वी, आंतरराष्ट्रीय धावपटू दिलीप घाडगे, निवृत्त लेफ्टनंट कमांडर विजय नायर, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष धीरेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहिती आणि सहभागी होण्यासाठी संपर्क – 9326111643