Site icon LNN

रोटरी मॅरेथॉनमुळे देशभरात कल्याणची ‘रनर्स सिटी’ अशी ओळख; ७व्या बोरगांवकर रोटरी कल्याण मॅरेथॉनचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार लॉन्चिंग

कल्याण | २३ ऑगस्ट :
कल्याण शहराची ओळख आता केवळ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणूनच नव्हे, तर देशाच्या क्रीडा नकाशावर ‘रनर्स सिटी’ म्हणूनही निर्माण होत आहे. गेल्या ६ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या बोरगांवकर रोटरी कल्याण मॅरेथॉनने धावण्याच्या स्पर्धेला सामाजिक बांधिलकीची जोड देत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची भावना मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केली आहे. यंदाच्या ७व्या बोरगांवकर रोटरी कल्याण मॅरेथॉनचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार लॉन्चिंग करण्यात आले. (Rotary Marathon Puts Kalyan on the National Map as a ‘Runners’ City’; 7th Borgaonkar Rotary Kalyan Marathon Grandly Launched in the Presence of Dignitaries)

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनच्या लॉन्चिंग सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष रमेश मोरे, सचिव प्रफुल्ल क्षीरसागर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी श्रीजीत पुथेन, नगरसेवक तथा उद्योजक उमेश बोरगांवकर, उद्योजक मच्छिंद्र जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मॅरेथॉनचे प्रोजेक्ट चेअरमन कैलास देशपांडे यांनी सांगितले की “बोरगांवकर रोटरी कल्याण मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा राहिलेली नाही, तर सामाजिक भान आणि सामाजिक बांधिलकी जपणारी चळवळ बनली आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून कल्याण शहराला देशभरात ‘रनिंग सिटी’ म्हणून नवी ओळख मिळत आहे.”

यंदाही होणार विशेष व्हीलचेअर रन…
या मॅरेथॉनमधील आणखी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी व्हीलचेअर रन यंदाही आयोजित करण्यात आली आहे. ५ किलोमीटर अंतरासाठी होणाऱ्या या विशेष रनसाठी अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे करण्यात आले आहे.

आतापर्यंत ४,५०० जणांना कृत्रिम अवयवांचा आधार…
या मॅरेथॉनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांना मोठे यश मिळाले आहे. सुमारे ४,५०० गरजू व्यक्तींना कृत्रिम अवयव बसविण्यात आले असून त्यांच्या आयुष्यात नव्या आशेची आणि आत्मविश्वासाची पहाट निर्माण करण्याचे काम रोटरीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे मॅरेथॉनच्या माध्यमातून फिटनेससोबतच सामाजिक संवेदनशीलतेचाही संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.

आयर्नमॅन आणि एव्हरेस्टवीरांची प्रेरणादायी उपस्थिती…
लॉन्चिंग सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधण्यात आला. व्हिएतनाम २०२६ आयर्नमॅन फिनिशर दर्शन कोळी यांची तसेच एव्हरेस्ट शिखर सर करणारे मराठी विक्रमवीर मिहिर जाधव यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि यशाची कहाणी उपस्थितांसाठी विशेषतः प्रेरणादायी ठरली.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.runindia.in/events/JXtTZF1pZTqQucFcvli-xw या लिंकद्वारे किंवा 9326211611 या क्रमांकाद्वारे तसेच पुढील QR कोडद्वारेही नोंदणी करता येईल.

Exit mobile version