Home ठळक बातम्या कल्याणातील जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचे निधन

कल्याणातील जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचे निधन

विनायक बेटावदकर
कल्याण दि.30 ऑगस्ट :
केवळ कल्याण शहराचेच नव्हे तर भारत देशाचे भूषण ठरलेले जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव उर्फ भाऊराव साठे यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

कल्याणातील एक घरंदाज कुटुंब म्हणून साठे कुटुंबियांची ओळख आहे. भाऊंचे काका हे त्या काळातील हरहुन्नरी कलाकार आणि उत्तम गणेश मूर्तीकार होते. त्यांच्या सहवासातूनच सदाशिवरावांना बालपणापासून मूर्तिकलेचे बाळकडू आणि प्रेरणा मिळाली. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जे जे आर्टसमधून 1948 मध्ये पहिल्या क्रमांकाने शिल्पकलेचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मिळेल ते काम मिळेल ती नोकरी उमेदीच्या काळात त्यांना करावी लागली. सुप्रसिद्ध निर्माते व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत त्यांनी सेट डिझाइन विभागात नोकरी केली. मात्र त्यानंतर एका अँटिक स्टोअरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करण्यासाठी ते दिल्लीला गेले आणि मग त्यांच्या ‘शिल्पकाराच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र तिथेही त्यांच्यातील कलाकाराची काहीशी घुसमट होत असताना दिल्ली नगरपालिकेने केलेल्या घोषणेनंतर भाऊंमधील कलाकाराला काही तरी करून दाखवण्याची एक आव्हानात्मक संधी प्राप्त झाली.

दिल्ली नगरपरिषदेने 1954 मध्ये महात्मा गांधीजींचा भव्य पुतळा दिल्लीत उभारण्याची ती घोषणा होती. महात्मा गांधींचा हा भारतातील सर्वात पहिला पुतळा बनणार असल्याने साहजिकच त्यामध्ये देशभरातील शिल्पकारांनी रस दाखवला. मात्र भाऊंनी आपल्या जिद्दीच्या आणि कलेच्या बळावर हे काम मिळवत हाताशी कोणतीही साधने किंवा मोठा अनुभव नसतानाही हे काम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले. या कामाबद्दल त्यांचा 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. यानंतर भाऊंच्या शिल्पकलेच्या अश्वाने अक्षरशः देश-विदेशात ठळकपणे पाऊलखुणा उमटवल्या.

त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला झाशीच्या राणीचा पुतळा बनवला, नागपूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी अनेक अत्युतकृष्ट शिल्प बनवली. तसेच दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. त्यापाठोपाठ लाल किल्ल्यावरील सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा, पोरबंदर येथील मोरारबाजीचा पुतळा यांसारख्या अनेक दिग्गज आणि नामांकित व्यक्तिमत्वाचे त्यांनी पुतळे बनवले.

त्यामुळे संपूर्ण भारतभर भाऊंच्या नावाची आणि त्यांच्या कौशल्याची चर्चा सुरु झाली. १९७२ मध्ये ते इंग्लंडला गेले होते. तिथे त्यांनी अवघ्या दिड तासात लॉर्ड माउंटबॅटन यांचा पुतळा पुतळा बनवला. भाऊंच्या कलेची ही कीर्ती तत्कालीन राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप्स यांच्यापर्यंत पोहोचली. आणि मग प्रिन्स फिलिप्स यांच्या विनंतीवरून भाऊंनी राणी एलिझाबेथ यांचाही पुतळा बनवला आणि आपल्या कलाकृतीने इंग्रजांना भुरळ पाडली.

‘शिल्पकला ही आज केवळ पुतळ्यांपर्यंतच मर्यादित आहे. मात्र शिल्प हे माणसाच्या सर्वांगीण भावनांचे चित्रण करणारे एक माध्यम आहे असे ते मानत. त्यातूनच त्यांनी डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र चित्र नगरीची निर्मिती केली. पु.ल.देशपांडे. शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, गान सम्राज्ञ लता मंगेशकर, उस्ताद बिस्मिल्ला खॉं अशा विविध साहित्यिक-संगीत क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींच्या ते सहवासात होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला एलएनएन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

……

आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार सदाशिव उर्फ भाऊ साठे यांचे वृध्दपकाळाने अल्पआजाराने दुःख निधन झाले.
कल्याण शहरातील अत्यंत मौल्यवान हिरा आज काळाच्या पडद्या आड गेला. भाऊंनी शिल्पकार म्हणून आपल्या दाशातच नव्हे तर परदेशातही अनेक ठिकाणी अनेक मान्यवरांची शिल्पे उभारली आहेत. आजही त्यांनी उभारलेली शिल्पे व नवीन पिढीला प्रोत्साहित करीत असतात. गेट वे आॕफ इंडियासमोरील अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा हा भाऊ साठे यांनी उभारला असून तो त्यांच्या कलेची साक्ष देत असतो. भाऊ साठे हे उत्तम वाचकही होते. त्यांचे संग्रही अनेक उत्तोमत्तम पुस्तकांचा साठा असून त्यांनी शिल्पकलेव दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. अतिशय मनमिळाऊ ,अभ्यासू व्यक्तीमत्व आज आपल्यामधून निघून गेल्याचे फारच दुःख होत आहे.
वैयक्तिक माझ्यातर्फे आणि सार्वजनिक वाचनालय कल्याणचे वतिने भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

भिकू बारस्कर
सरचिटणीस ,सार्वजनिक वाचनालय कल्याण

मागील लेखकल्याणचे तहसीलदार आणि शिपायाला 1 लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 30 रुग्ण तर 54 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा