Home ठळक बातम्या कुपोषण निर्मूलनाच्या मदतनिधीसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे ‘सलाम आशा’

कुपोषण निर्मूलनाच्या मदतनिधीसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे ‘सलाम आशा’

सहकार्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन

कल्याण दि. २६ नोव्हेंबर :
ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील कुपोषण निर्मूलनाच्या मदत निधीसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे ‘ येत्या ४ डिसेंबरला डोंबिवलीत ‘सलाम आशा ‘ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून जमा होणारा सर्व निधी हा आदिवासी पाड्यांवरील बांधवांसाठी वापरला जाणार असून त्यासाठी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन रोटरीचे अध्यक्ष डॉ. अनंत इटकर यांनी केले आहे.

८ वर्षांपासून आदिवासी भागात कुपोषण निर्मूलनाचे काम…

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे गेल्या आठ वर्षांपासून मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या शिरोशी, न्याहाडी, टोकवडे, तुळई आणि मोरोशी बीट या आदिवासी भागात कुपोषण निर्मूलनाचे काम सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत सुमारे दोनशे कुपोषित बालकं आणि स्तनदा मातांना दर महिन्याला पोषक आहार आणि रक्तातील लोह वाढीसाठी पूरक औषधे दिली जात आहेत. विशेष म्हणजे रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडच्या या सामाजिक उपक्रमाला आता यश येऊ लागले असून गेल्या आठ वर्षांत कुपोषणाने एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती बालरोग तज्ञ आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अनंत इटकर यांनी दिली.

मदतनिधीसाठी ४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कार्यक्रम…

हा उपक्रम विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळेच राबवण्यात येत असून दिवसागणिक खर्चाचा भार वाढला आहे. या पार्श्वभमीवर या उपक्रमासाठी मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने येत्या ४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निधी संकलन आणि सामाजिक उपक्रमांसाठी कल्याण रिव्हर साईड चेरिटेबल फाऊंडेशन नावाने रजिस्टर ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याचेही डॉ. इटकर यांनी सांगितले. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी या कुपोषण निर्मूलनाच्या सामाजिक उपक्रमामध्ये खारीचा वाटा उचलून हातभार लावण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे करण्यात आले आहे.

मदती आणि अधिक माहितीसाठी संपर्क – 98920 79794

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा