कर्म, धर्म, कर्तव्यातले हिंदुत्व विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
कल्याण दि.16 डिसेंबर:
अखिल भारतीय ब्राह्मण संघ, कल्याण शहराच्या वतीने भगवत गीतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात संभवामी युगे युगे हा भगवतगीतेतील 18 अध्यायांचा संक्षिप्त स्वरुपातील नृत्याविष्कार, नृत्याली भरतनाट्यम अकादमी नाशिक येथील गुरु सोनाली करंदीकर व शिष्या सादर करणार आहेत. तसेच कर्म, धर्म, कर्तव्यातले हिंदुत्व विषयावर प्रमुख वक्ते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर कल्याण येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण संघ, कल्याण शहरचे अध्यक्ष सारंग केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Sambhavami Yuge Yuge” Programme Organised in Kalyan by Akhil Bharatiya Brahmin Mahasangh)
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा आशिष दामले, पिंताबरी उत्पादने संचालक रविंद्र प्रभुदेसाई, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामराव जोशी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल लातुरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शशांक खेर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच कल्याणातील सकल ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कल्याण शहर कल्याणातील सर्व ब्राह्मण संस्था यांच्या सहकार्याने सकल ब्राह्मण एकीकरण व सबलीकरणासाठी पाच-सहा वर्षापासून कार्यरत आहे. या माध्यमातून कल्याण शहरातील गरीब गरजु ब्राह्मण परिवारास शैक्षणिक, वैद्यकीय, मदत, शिधावाटप, माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव, परशुराम जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, नववर्ष स्वागत यात्रा, महिलादिन आदी सामाजिक कार्यक्रम दर वर्षी आयोजित करीत असते.
त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यावरील गरजूंना, पूरग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना धान्य, कपडे, इतर साहित्य वाटप करीत सामाजिक बांधिलकी जपत असते. तसेच दिवाळी फराळ वाटप, सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवुन बंधुत्वाचे नाते आम्ही जपत असतो. याचाच एक भाग म्हणून निधी संकलनाची संकल्पना पुढे आली असून त्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जमा होणारा निधी समाजाच्या शिक्षणासाठी वैद्यकीय मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सारंग केळकर यांनी दिली.

