Site icon LNN

इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या अध्यक्षपदी संगीता शिंदे; नव्या कार्यकारिणीचा दिमाखदार पदग्रहण सोहळा

कल्याण | १४ जुलै :
सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या अध्यक्षपदी संगीता अरविंद शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. कल्याण पश्चिम येथील कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूलच्या सभागृहात इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१४च्या आयपीडीसी लक्ष्मी सिंग, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्सचे अध्यक्ष रोटेरियन दिपक सावंत यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संगिता शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. (Sangeeta Shinde Installed as President of Inner Wheel Club of Kalyan Diamonds; New Executive Team Takes Charge at Grand Installation Ceremony)

कल्याणसह आसपासच्या परिसरात आपल्या सामाजिक कार्यक्रम आणि बांधिलकीच्या माध्यमातून इनरव्हील क्लबने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच अवघ्या काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या रोपट्याचे आता मोठ्या वृक्षाच्या दिशेने रूपांतर होत असल्याची कौतुकाची थाप इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१४च्या आयपीडीसी लक्ष्मी सिंग यांनी दिली.

तर आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काही देणे लागतो या भावनेतूनच माझ्यासारख्या असंख्य महिला इनरव्हील क्लबच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. आपण सर्वजणी मिळून आपल्या कृतीमधून इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल असे समाज उपयोगी प्रोजेक्ट करूया, यासाठी मी माझ्या क्षेत्रात माझ्या सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचा आणि प्रशिक्षणाचा क्लबसाठी पुरेपूर उपयोग करीन अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष संगिता शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे माजी अध्यक्ष तथा केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, डी.बी ग्रुपचे उद्योजक मच्छिंद्र जाधव, रोटरियन बाळासाहेब एरंडे, राजेश चासकर, याकूब भेतासीवाला, हायसेंथ भेतासीवाला, इनर्व्हिल झोन ६ डिस्ट्रिक्ट को ऑर्डिनेटर करुणा घोप यांच्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version