Site icon LNN

आधारवाडी डंपिंग ग्राउंडवरील बायोमायनिंग प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात ; पुढील 6-8 महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

तर शहरातील कचरा वर्गीकरणही पोहोचले 450 टनांवर

कल्याण–डोंबिवली दि.25 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी डंपिंग ग्राउंडवरील बायोमायनिंग प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यात सुमारे ९ लाख मेट्रिक टन कचऱ्याचा ढीग बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करून संपूर्ण क्षेत्र मोकळे करण्याचा महत्त्वाकांक्षी कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे. तसेच या कचऱ्याचे प्रमाण पाहता अतिरिक्त मशिनरी तसेच मनुष्यबळाच्या माध्यमातून कामाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. (Second Phase of Biomining Project Begins at Aadharwadi Dumping Ground; Target to Complete in Next 6–8 Months)

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी आज घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासमवेत कल्याणमधील आधारवाडी डंपिंगसह उंबर्डे, बारावे आणि डोंबिवलीतील महापालिकेच्या ओला – सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची काल पाहणी केली.

रिंगरोडचा टप्पा पूर्ण करण्याचा मार्गही मोकळा होणार…
आधारवाडी डंपिंग ग्राउंडवर कोविड काळातच कचरा टाकणे बंद करण्यात आले असून बायोमायनिंग पद्धतीच्या माध्यमातून हा कचऱ्याचा डोंगर रिकामा करण्यात येत आहे. या कामातून आतापर्यंत हजारो मेट्रिक टन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यश आले असून या प्रक्रियेतून तयार होणारे RDF (Refuse Derived Fuel) सिमेंट कारखान्यांना पुरवण्यात येत आहे , चाळून प्राप्त झालेली माती केडीएमसीच्या प्रस्तावित नागरी प्रकल्पांच्या लँडफिलिंगसाठी वापरण्यात येणार आहे. इतकेच नाही तर डंपिंग ग्राउंड पूर्णपणे रिकामे झाल्यानंतर दुर्गाडी ते बारावे असा प्रस्तावित रिंग रोडचा टप्पा पूर्ण करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

मोकळ्या जागेवर फुलणार उद्यान आणि इतर सुविधा…
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह आधारवाडी डंपिंग ग्राउंडवरील कामाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले की, पुढील ६ ते ८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, कामाचा वेग वाढावा यासाठी अधिक मशिनरी आणि मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्त गोयल यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उरलेली मोकळी जागा सिटी ब्युटिफिकेशन, उद्याने (पार्क) किंवा नागरिकांसाठी इतर सार्वजनिक सुविधाही विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कल्याण डोंबिवलीतील कचरा वर्गीकरण 70%पेक्षा अधिक वाढले…
दरम्यान केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी आधारवाडी डंपिंगनंतर उंबर्डे येथील ओला कचरा (WET WASTE)आणि बारावे येथील सुका कचरा (Dry Waste) प्रकल्पांनाही भेट दिली. त्यावेळी बारावे येथील सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण तिपटीने वाढले असल्याची महत्त्वपूर्ण बाब त्यांच्या निदर्शनास आली. बारावे प्रकल्पाची क्षमता 200 टन इतकी असून नागरिकांकडून कचरा वर्गीकरण वाढले असल्याने 150 टन प्रतिदिन कचरा याठिकाणी येत असल्याचे सांगत त्यांनी शहरातील नागरिकांचे विशेष कौतुक केले. तसेच हा कचरा नसून ते सोने आहे,याठिकाणी येणाऱ्या कचऱ्यातून निघणारे रिफ्युज फ्युएल हे सिमेंट तसेच प्लॅस्टिक फॅक्टरीना देण्यात येत आहे. ज्याद्वारे आपण आपले शहर तर सुंदरच ठेवण्यासोबतच पर्यावरण रक्षणामध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहोत. त्यामुळे नागरिकांनी सर्व प्रकारचा कचरा अधिकाधिक प्रमाणात वर्गीकरण करून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वेंगुर्ला पॅटर्नचे जनक उपायुक्त रामदास कोकरे यांची विशेष मेहनत…
या विविध कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्यामध्ये आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रत्येक ठिकाणच्या प्रक्रियेची सखोल माहिती उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडून जाणून घेत प्रकल्पांची कार्यक्षमता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने संबंधितांना सूचना केल्या.विशेष म्हणजे कोव्हिड काळात रामदास कोकरे हे उपायुक्त असताना 90%पर्यंत वर्गीकरण साध्य झाल्यानेच आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद होऊ शकले होते. आता डंपिंग ग्राऊंड ही ओळख कायमची पुसली जाऊन या ठिकाणी भव्य असे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.भविष्यात डंपिंग ग्राऊंड निर्माण होणारच नाही या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत असून आयुक्त अभिनव गोयल यांचे मार्गदर्शनाखाली घनकचरा विषयात विविध शहरात उल्लेखनीय कामगिरी केलेले वेंगुर्ला पॅटर्नचे जनक उपायुक्त रामदास कोकरे विशेष मेहनत घेत आहेत.

Exit mobile version