Home ठळक बातम्या उद्यापासून (1 डिसेंबर 2018) ओला-सुका कचरा वेगळा न करता दिल्यास भरावा लागणार...

उद्यापासून (1 डिसेंबर 2018) ओला-सुका कचरा वेगळा न करता दिल्यास भरावा लागणार दंड

कल्‍याण 30 नोव्हेंबर :
ओला आणि सुका कचरा वेगळा न करता दिला तर आता तुम्हाला दंड भरावा लागेल असा इशारा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिला आहे. उद्यापासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण केलेले नसल्यास अशा सोसायट्यांमधून कचरा उचलला जाणार नाही. यासंदर्भात महापालिकेने सर्व गृहनिर्माण सहकारी संस्‍थांना ‘नागरी घनकचरा नियम 2016 अन्‍वये नोटिसा दिल्‍या असून त्याद्वारे या सूचना देण्यात आल्या आहेत.

*ओला कचरा दररोज उचलण्‍यात येणार असून सुका कचरा हा गुरुवार आणि रविवारी उचलण्‍यात येईल. कचरा वेगळा करुनच तो महापालिकेकडे द्यायाचा आहे. कच-याचे विलगीकरण करुन न दिल्‍यास, असा कचरा महापालिका स्विकारणार नाही. या नियमांचे उल्‍लंघन करणा-या व्‍यक्ति, संस्‍था, आस्‍थापना, दुकानदार आदींवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचा इशाराही महापालिका आयुक्‍तांनी दिला आहे.*

सर्व वैयक्तिक कुटूंबे, समुह, गृहनिर्माण संस्‍था, निवासी संकुले, निवासी कल्‍याण व बाजार संकुले, हॉटेल व, उपहारगृहे, दुकाने, कार्यालये तसेच वाणिज्‍य आस्‍थापनांमध्‍ये निर्माण होणा-या घनकच-याचे विलगीकरण करण्‍याची जबाबदारी संबंधित कचरा निर्माण करणा-यांची आहे. त्‍यामुळे कचरा निर्माण होणा-या प्रत्‍येक ठिकाणी ओला, सुका व घरगुती घातक कच-याची अनुक्रमे हिरव्‍या, निळया व लाल रंगाचे तीन स्‍वतंत्र डबे ठेवून (Dustn bin) विलगीकरण केलेला कचरा त्‍यामध्‍ये जमा करण्‍यात यावा.

*फेरिवाल्‍यांमार्फत रस्‍त्‍यावर विक्री करतांना निर्माण होणा-या घनकच-याचे विलगीकरण करुन साठवणूक करून तो कचरा महापालिकेने अधिसूचित केलेल्‍या कचरा डेपोत किंवा कचरा गा‍डीत देण्‍याची जबाबदारी रस्‍त्‍यावर फेरीवाल्‍यांची असणार आहे. तर जी गृहसंकुले ५००० चौ.मी. बिल्‍टअप एरियाची आहेत किंवा त्‍यापेक्षा जास्‍त एरियाची आहेत. अशा सर्व गृहसंकुलांवर त्‍यांच्‍या आवारात निर्माण होणा-या सर्व प्रकारच्‍या कच-याची विल्‍हेवाट शास्‍त्रोक्‍त पध्‍दतीने लावण्‍याची जबाबदारी असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.*

आपले शहर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी आपणा सर्वांचा सहभाग अत्‍यावश्‍यक असल्‍याने कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेला स्‍वच्‍छतेच्‍या कामी सहकार्य करावे. नागरिकांच्‍या सहभागाशिवाय शहर स्‍वच्‍छ ठेवणे शक्‍य होणार नसल्‍याने सर्वांनी महापालिका प्रशासनाला स्‍वयंस्‍फुर्तीने सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्‍त गोंविंद बोडके यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*