Site icon LNN

एमएमआरमध्येही तीव्र उष्णतेचे चटके ; कल्याण-डोंबिवलीचा पारा तब्बल ४३°C पार

कल्याण, दि. २५ एप्रिल :
आंतरिक कोकणासह राज्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून तिचे परिणाम आज मुंबई महानगर प्रदेशातही (MMR) जाणवले. कल्याण-डोंबिवली परिसरात तापमानाने तब्बल ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद झाल्याची माहिती कोकण हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. (Severe Heatwave Hits MMR; Kalyan-Dombivli Temperature Soars Past 43°C)

त्याचबरोबर आंतरिक कोकणातील अनेक भागांत २०२६ च्या हंगामात प्रथमच तापमान ४५°C च्या पुढे गेले असून घाटमाथ्यालगतच्या भागात ही नोंद झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिजीत मोडक यांनी एलएनएला दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी आंतरिक कोकणात तापमान ४० ते ४५ अंशांच्या दरम्यान राहिले. चिपळूण (४४°C), अंबेरे-ताम्हाणे (४२.२°C), महाड-बिरवाडी येथे सर्वाधिक ४५.१°C तापमान नोंदले गेले, तर कर्जत (४५°C), सुकसाळे (४४.८°C), भातसानगर (४४.७°C), नेरळ (४४.६°C) आणि पालवा (४४.१°C) येथेही उष्णतेचा उच्चांक गाठला.

एमएमआर रिजन (MMR) परिसरातील अंबरनाथ (४३.८°C), मनोर (४३.७°C), तळोजा (४३.४°C), कल्याण (४३.३°C), मोरबे (४३.२°C), बदलापूर (४३.१°C) आणि डोंबिवली (४३°C) येथे उष्णतेची तीव्रता जाणवली. याशिवाय खारघर (४२.९°C), दिघा (४२.७°C), ऐरोली (४२.५°C), कळवा-दिवा (४२.१°C), ठाणे (४१.७°C), पनवेल (४१.५°C), मुलुंड (४१.३°C), कोपरखैराणे (४१.२°C), कांजूरमार्ग (४०.६°C) आणि नवी मुंबई विमानतळ (४०°C) येथेही तापमान ४० अंशांपुढे गेले.

याउलट, समुद्रकिनाऱ्यालगतच्या ० ते ५ किमी पट्ट्यात तापमान तुलनेने नियंत्रित राहिले. बेलापूर (३८.८°C), देवनार (३८.२°C), विरार (३७.९°C), नेरुळ (३७.७°C), डहाणू (३६.६°C), उत्तन (३६.३°C), रत्नागिरी (३६°C), मुंबई एसईझेड (३५.८°C), दादर (३४°C), जुहू (३३.९°C), कुलाबा (३३.७°C) आणि हर्णे (३३.६°C) येथे तुलनेने कमी तापमान नोंदले गेले.

दरम्यान, विदर्भातील अकोला आणि अमरावती येथे ४५.६°C, वर्धा ४५.५°C, तर नागपूर आणि चंद्रपूर येथे ४४.२°C तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आंतरिक कोकण आणि विदर्भातील उष्णतेच्या तीव्रतेत लक्षणीय साम्य दिसून येत आहे.

“आंतरिक कोकणातील उष्णतेची तीव्रता विदर्भासारखीच असूनही ती अनेकदा अधिकृत नोंदींमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित होत नाही,” असे स्पष्ट मत अभिजीत मोडक यांनी व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी, दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version