(प्रातिनिधिक फोटो)
-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात
-३२५.९३ कोटींच्या प्रकल्पातून शहाड येथे दोन नवीन दोन पदरी पूल उभारणार
कल्याण | ५ नोव्हेंबर
कल्याण आणि उल्हासनगर शहरांना जोडणाऱ्या शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याचे
कार्यादेश देण्यात आले आहेत. यामुळे आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि या प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांतून शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुमारे ३२५.९३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून सध्याच्या जुन्या आणि अरुंद पुलाला पर्याय म्हणून दोन नवीन दोन पदरी पूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याण, उल्हासनगर तसेच मुरबाडच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सध्याचा जुना पूल टप्प्याटप्प्याने पाडून त्याच जागी आणखी एक नवीन दोन पदरी पूल उभारण्यात येईल. यामुळे वाहतूक सुरळीत राहील. (Shahad Railway Flyover Project Set to Begin Soon; Major Traffic Relief Expected for Kalyan and Ulhasnagar)
भविष्याची गरज ओळखून या पुलाच्या पुनर्बांधणीचा निर्णय…
शहाड रेल्वे स्थानकाजवळील सध्याचा रेल्वे उड्डाणपूल सुमारे ४० वर्षे जुना असून, केवळ दोन पदरी असल्याने या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होतो. कल्याण आणि उल्हासनगर या दोन शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि अहमदनगरच्या दिशेने ये-जा करणारी अवजड वाहनेही याच पुलाचा वापर करतात. दोन्ही बाजूंना रुंद रस्ते असतानाही पुलावर अचानक रुंदी कमी होत असल्याने वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण होतो. वाढती वाहनसंख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या पुलाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिटवाळा-बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि बळकटीकरण या प्रकल्पांतर्गत शहाड रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, संपूर्ण प्रकल्पासाठी ३२५.९३ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १९९.२१ कोटी रुपये स्थापत्य कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. एमएमआरडीएमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
बांधकाम दोन टप्प्यांत करण्यात येणार…
या प्रकल्पाचे बांधकाम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सध्याच्या पुलाच्या बाजूने नवीन दोन पदरी रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येईल. हा पूल साई निर्वाणा डाऊनटाऊन सोसायटीसमोरून सुरू होऊन मोहने रस्ता ओलांडत शहाड रेल्वे स्थानकावरून उल्हासनगरच्या दिशेने जाणार आहे. उल्हासनगरच्या बाजूला पॅरेडाईज प्लाझा परिसरात स्थानिक वाहतुकीसाठी उतारमार्ग, तर पुलाचा स्वतंत्र फाटा डी-मार्टच्या पुढे जोडण्यात येणार आहे. यामुळे मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल. मोहने रस्त्यावरून उल्हासनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी थेट चढमार्गाची सुविधा देण्यात येणार असून, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुमारे ५० मीटरचा स्वतंत्र मार्ग उभारण्यात येणार आहे.
नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर जुना पुलाच्या जागी आणखी एक पूल…
पहिल्या टप्प्यातील नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सध्याचा जुना पूल टप्प्याटप्प्याने पाडून त्याच जागी आणखी एक नवीन दोन पदरी पूल उभारण्यात येईल. डी-मार्ट आणि पॅरेडाईज प्लाझा परिसरातून चढमार्ग, तसेच मोहने रस्त्याच्या दिशेने उतारमार्ग देऊन या पुलाची जोडणी पूर्ण केली जाणार आहे. बांधकामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील पूल सुरू झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेतले जाणार आहे.
कल्याण-उल्हासनगरमधील वाहतुकीवरील ताण कमी होणार…
दोन्ही टप्प्यांतील काम पूर्ण झाल्यानंतर शहाड येथे मध्य रेल्वे मार्गावरून जाणारे दोन स्वतंत्र दोन पदरी असे एकूण चार पदरी रेल्वे उड्डाणपूल उपलब्ध होतील. त्यामुळे सध्याच्या जीर्ण आणि अरुंद पुलामुळे निर्माण होणारा वाहतुकीचा अडथळा दूर होण्यास मदत होईल. मोहने रस्ता, डी-मार्ट आणि पॅरेडाईज प्लाझा येथील जोडमार्गांमुळे विविध दिशांनी येणाऱ्या वाहनांची वाहतूक अधिक नियोजनबद्ध होईल. विशेषतः मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने कल्याण-उल्हासनगरमधील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
म्हणून शहाड रेल्वे उड्डाणपुलाचा हा प्रकल्प महत्त्वाचा…
कल्याण आणि उल्हासनगर या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमधील वाढती वाहनसंख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेता शहाड रेल्वे उड्डाणपुलाचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रकल्प प्रत्यक्ष बांधकामाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या कामामुळे शहाड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रवास अधिक सुरक्षित होण्यास आणि कल्याण-उल्हासनगरसह आसपासच्या परिसरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.

