Site icon LNN

कल्याण डोंबिवलीत शेअर रिक्षाचा प्रवास महागला ; प्रत्येक सीटमागे तब्बल 3 ते 5 रुपयांची भाडेवाढ

(फोटो सौजन्य: आदित्य राणे)

कल्याण डोंबिवली दि.24 जून :
कल्याण डोंबिवलीतील शेअर रिक्षाच्या भाड्यात कालपासून वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक सीटमागे तब्बल 3 ते 5 रुपये इतकी ही भाडेवाढ करण्यात आल्याची माहिती रिक्षा संघटनेकडून देण्यात आली आहे. इतकेच नाही तर मीटरच्या रिक्षा प्रवासासाठीही तीन रुपयांची भाडेवाढ झाली आहे.

कल्याण आरटीओ क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथसह इतर ठिकाणी रिक्षाचालकांनी ही भाडेवाढ करायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी सरकारने ही भाडेवाढ जाहीर केली होती. मात्र मीटर रिकॅलिब्रेशन केले जात असल्याने ती लागू करण्यात आली नव्हती. मात्र आजमितीस 95% रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशनच्या झाल्याने ही भाडेवाढ करण्यात आल्याची माहिती रिक्षा संघटनेकडून देण्यात आली आहे.

कोरोनानंतर रिक्षाचालकांनी ३ ते ५ रुपये दरवाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिक्षाचालकांनी ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेअर रिक्षासाठी पूर्वी १५ रुपये मोजावे लागत होते, त्याठिकाणी १८ ते २० रुपये लागणार आहेत.

विशेष म्हणजे, रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणेही दरवाढ केली आहे. पण, कल्याण आणि डोंबिवली परिसरात रिक्षाचालक हे मीटरने रिक्षाचे भाडे घेतच नाहीत. तरीही भाडेवाढ केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांनी या भाडेवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version