कल्याण दि.30 डिसेंबर :
केडीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रेयस समेळ यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तसेच पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून आपल्या मनातील खंत त्यात मांडली आहे. (Shiv Sena Assembly Coordinator Shreyas Samel and Office Bearers Resign After Denial of Ticket; Emotional Letter Written to Party Chief Eknath Shinde)
आपण गेली दीड दशक शिवसेनेच्या प्रत्येक आदेशाचे पालन करत पक्षाच्या निवडणुका, आंदोलने आणि विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. तसेच २०२२ मध्ये झालेल्या राजकीय उठावानंतर कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण ताकदीनिशी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहून पक्षवाढीसाठी सातत्याने कामही केल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी पूर्ण क्षमतेने काम करून आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः कल्याण पश्चिममधून इच्छुक असूनही पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर एका फोन कॉलनंतर पक्षाने ज्या उमेदवाराला तिकीट दिले, त्यांच्यासाठीही प्रामाणिकपणे काम करून प्रभागात भरघोस मते मिळवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. इतकेच नाही तर पक्षाला कधीही वेठीस धरण्याचा किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्नही आपण कधीच केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे महापालिका निवडणुकीत आपल्या पॅनलमधील एकमेव “सीटिंग नगरसेवक” असतानाही, स्थानिक नेतृत्वाच्या कथित गलिच्छ राजकारणामुळे आणि ज्येष्ठ नेत्यांना दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे आपल्याला पक्षाचे तिकीट नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. तर हा निर्णय अन्यायकारक असून त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

