Site icon LNN

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न पुरस्कार’ जाहीर ; 6 विधेयकांची संसदेत प्रभावी मांडणी

(प्रातिनिधिक फोटो)

संसदेतील प्रभावी कामगिरी, जनहिताचे प्रश्न आणि अभ्यासपूर्ण मांडणीची राष्ट्रीय स्तरावर दखल

नवी दिल्ली| २४ मे :
देशातील संसदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “संसद रत्न पुरस्कार २०२६” यंदा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा त्यांना हा सन्मान प्राप्त होत असून, २०२४ नंतर पुन्हा एकदा त्यांच्या संसदीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संसदेत नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, देशहिताच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणे, विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा, युवक, रोजगार, शहरी प्रश्न प्रभावीपणे मांडणे. याचबरोबर त्यांनी एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी मांडलेल्या सहा महत्त्वाच्या खासगी विधेयकांच्या अनुषंगाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. (Shiv Sena MP Dr. Shrikant Eknath Shinde Announced as ‘Sansad Ratna Award’ Winner for the Second Consecutive Time; Effectively Presented 6 Private Member Bills in Parliament)

संसद रत्न पुरस्कार समितीच्या घोषणेनुसार, यंदा देशभरातील १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय समित्यांमधील खासदारांची निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेमध्ये खासदारांची संसदेतील उपस्थिती, चर्चांमधील सहभाग, विचारलेल्या प्रश्नांची गुणवत्ता, जनहिताच्या मुद्द्यांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा, खासगी विधेयक आणि संसदीय योगदानाचा व्यापक आढावा घेतला जातो.

संसद रत्न पुरस्काराची स्थापना २०१० साली ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत करण्यात आली होती. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनंतर या पुरस्काराला सुरुवात झाली. संसदीय लोकशाही अधिक सक्षम व्हावी, लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये प्रभावीपणे जनतेचे प्रश्न मांडावेत आणि सकारात्मक संसदीय परंपरांना प्रोत्साहन मिळावे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.

या पुरस्कारासाठी निवड करताना संसदेतील अधिकृत आकडेवारी, पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयातील माहितीचा आधार घेतला जातो. ज्युरीमध्ये माजी संसदीय अधिकारी, घटनातज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असतो. त्यामुळे संसद रत्न पुरस्कार हा संसदीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि विश्वासार्ह सन्मान मानला जातो.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत संसदेत सातत्याने सक्रिय भूमिका बजावत महाराष्ट्र आणि विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघाशी संबंधित अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले. रेल्वे, वाहतूक, आरोग्य सुविधा, शहरी विकास, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, युवकांचे प्रश्न, पर्यावरण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला.

देशाच्या विकासाला गती देणाऱ्या विविध धोरणांवर सकारात्मक चर्चा करताना जनतेच्या अडचणी देखील ठामपणे मांडण्याची त्यांची शैली संसदेत विशेष लक्षवेधी ठरली. अभ्यासपूर्ण मांडणी, सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे दुसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासाठी देखील ही अभिमानाची बाब असून, यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना स्थान मिळाले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर झालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या संसदीय कार्याची ही राष्ट्रीय पातळीवरील पोचपावती आहे.

संसदेत जनहिताच्या ६ महत्त्वपूर्ण खासगी विधेयकांची मांडणी…
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गेल्या एका वर्षात संसदेमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, कायदेशीर आणि जनकल्याणाशी संबंधित ६ महत्त्वपूर्ण खासगी विधेयके मांडत अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख भूमिका अधोरेखित केली. संसद रत्न पुरस्कार २०२६ साठी त्यांच्या निवडीमध्ये या प्रभावी संसदीय कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत डीपफेकसारख्या आधुनिक तांत्रिक धोक्यांवर नियंत्रण आणण्यासाठी “डीपफेक नियमन विधेयक”, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी “राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध व आपत्तीग्रस्त कल्याण मंडळ विधेयक”, गोसंवर्धन आणि संरक्षणासाठी “गोसंवर्धन व संरक्षण विधेयक”, अनाथ मुलांच्या कल्याण आणि विकासासाठी “अनाथ बालक कल्याण व विकास विधेयक”, शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा करण्यासाठी “मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क सुधारणा विधेयक” तसेच कायदा व्यवस्थेशी संबंधित महत्त्वपूर्ण बदलांसाठी “अधिवक्ता सुधारणा विधेयक” संसदेत सादर केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली…
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर मांडण्यासाठी भारत सरकारने विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवली होती. त्यापैकी एका महत्त्वाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. संयुक्त अरब अमिराती (UAE), लायबेरिया, सिएरा लिओन आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांच्या दौऱ्यावर जाऊन त्यांनी भारताची दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका प्रभावीपणे मांडली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताची ‘झिरो टॉलरन्स टू टेररिझम’ ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संसदेतील प्रभावी कामगिरीबरोबरच जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत देशहिताची भूमिका ठामपणे मांडणे, ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संसदीय कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी आहे

Exit mobile version