शेतकरी कुटुंबांसाठी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने दिवाळीचा शिधा पाठवणार,
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना स्तुत्य उपक्रमाबाबत दिल्या शुभेच्छा
डोंबिवली | १८ ऑक्टोबर
दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, शेतकरी कुटुंबांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून, दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. तसेच, येत्या दसरा मेळाव्याच्या दिवशी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे मोठ्या संख्येने ट्रक रवाना करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. (“Shiv Sena Stands Firmly with Drought-Hit Farmers” – Deputy Chief Minister Eknath Shinde Visits Sharadiya Navratri Festival in Dombivli)
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्र उत्सवात दांडीया आयोजित न करता भजन संध्या, संगीत कार्यक्रम अशा साधेपणाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी या रासरंग दांडिया उत्सवाचा निधी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी देण्यात येत आहे. या उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचे दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला. दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस यावेत, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली. बळीराजाच्या मदतीला समाजातील सर्वांनी एकत्रितपणे उभे राहण्याची गरज व्यक्त करताना, शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात यंदा भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यानिमित्त आज आयोजित भजनसंध्येत कोकणातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेतला. देवीची भजने, श्री गणेशाची भजने आणि पारंपरिक भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने संपूर्ण सभामंडप भक्तिरसात न्हाऊन निघाला. सुंदररीत्या उभारण्यात आलेल्या सभामंडपातील भक्तिमय वातावरणाने उपस्थित भाविक भारावून गेले.
“महाराष्ट्र ही संतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. आपल्या राज्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून भक्तिगीते, भजने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा उत्सवांमुळे समाज एकत्र येतो, आपली परंपरा अधिक दृढ होते आणि नव्या पिढीला संस्कृतीची ओळख होते,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनही समाजाशी जोडलेले आहेत. आपल्या परंपरा जपणारे आणि सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करणारे असे उपक्रम निश्चितच महत्त्वाचे आहेत, असे नमूद करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मदतकार्याचा उल्लेख करताना त्यांनी महिलांच्या स्वावलंबनावरही भर दिला. शेतकरी कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी मदत करण्यात येणार असून, दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक रवाना करून शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या नवरात्रोत्सवात दुष्काळग्रस्त बळीराजाप्रती संवेदनशीलता व्यक्त करण्यासोबतच भक्ती आणि संस्कृतीचा जागर करण्यात येत आहे. एका बाजूला कोकणातील भजन मंडळांच्या सादरीकरणातून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले तर दुसरीकडे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचा सामाजिक संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरा यांची सांगड घालणारा हा नवरात्रोत्सव डोंबिवलीकरांसाठी विशेष ठरत आहे.
बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी गाऱ्हाणे…
डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात यंदा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांप्रती संवेदनशीलता व्यक्त करणारा अनोखा उपक्रम पाहायला मिळाला. दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस यावेत, शेतकरी बांधवांना या संकटातून दिलासा मिळावा आणि त्यांच्या कुटुंबांत पुन्हा आनंद नांदावा, यासाठी मालवणी भाषेत देवीचरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. कोकणच्या मातीत रुजलेल्या लोकपरंपरेतून व्यक्त झालेली ही प्रार्थना उपस्थितांच्या मनाला भावली. भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात बळीराजाच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या या गाऱ्हाण्यातून शेतकऱ्यांच्या वेदनांशी जोडलेली सामाजिक संवेदनशीलता आणि आपल्या लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडले.
शेतकऱ्यांसाठी मदतीचा ओघ…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले असताना, शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा कणा असून, त्याच्यावर संकट ओढवल्यानंतर त्याला आधार देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, या भावनेतून हा मदतीचा उपक्रम राबवण्यात आला.

