Home ठळक बातम्या इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे तर विजबिलांबाबत भाजपचे कल्याणात आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे तर विजबिलांबाबत भाजपचे कल्याणात आंदोलन

एकमेकांच्या सरकारवर दोन्ही पक्षांकडून तोंडसूख

कल्याण दि.5 फेब्रुवारी :
कल्याणातील आजची सकाळ शिवसेना आणि भाजपच्या वेगवेगळ्या आंदोलनांमूळे चांगलीच गाजलेली पाहायला मिळाली. शिवसेनेकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात तर भाजपकडून राज्यातील आघाडी सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आली. इंधन आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून भाजप सरकारवर तर विजबिलांच्या मुद्द्यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच तोंडसूख घेण्यात आले.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी कोळशावर चूल पेटवून त्यावर भाकरी भाजत केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आपला राग व्यक्त केला. आधीच इंधन दरवाढीमूळे लोकांचे कंबरडे मोडलेले असताना त्यात स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ करून केंद्राने सामान्य नागरिकांना आगीतून फुफाट्यात लोटल्याची प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. तर यावेळी केंद्राच्या इंधन दरांबाबतच्या धोरणांविरोधात, मोदी सरकारविरोधात शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत यथेच्छ टिकाही करण्यात आली. शिवसेनेच्या या आंदोलनात आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे नेते रवी पाटील, रवी कपोते महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांबाबत नागरिकांची फसवणूक केल्याचे सांगत कल्याण शहर भाजपतर्फे महावितरणच्या तेजश्री कार्यालयासमोर ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात एकीकडे राज्यातील अनेकांच्या नोकऱ्या रोजगार गेले असताना राज्य सरकार मात्र जबरदस्तीने वीजबिल वसूली करत आहे. ही अत्यंत चुकीची भूमिका असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घेत जनसामान्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी भाजपच्या कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिली. तसेच या प्रश्नावर जोपर्यंत सरकार नागरिकांना दिलासा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहण्याचा इशाराही भाजपतर्फे देण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तेजश्री कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत भाजप कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी भाजपकडून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मागील लेखदुर्गाडी किल्ल्याजवळ साकारले जाणार ‘नौदल संग्रहालय’; छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जाणार मानवंदना
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 70 रुग्ण तर 84 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा