Home कोरोना कोरोनामूळे आर्थिक गणित बिघडलेल्या कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

कोरोनामूळे आर्थिक गणित बिघडलेल्या कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

 

दिवाळीचे साहित्य आणि फराळाच्या सामानाचे अत्यल्प दरात वितरण

डोंबिवली दि.28 ऑक्टोबर :
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असली तरी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित मात्र कोरोनामुळे बिघडून गेले आहे. त्यातच महागाईमूळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून आधीच लोकं हैराण झाली आहेत. अनेकांचे रोजगार बंद पडले तर कित्येकांचे व्यवसाय कोलमडले. अशा गंभीर आर्थिक परिस्थितीत रोजच्या जेवणाची भ्रांत असताना सणवार साजरे करणे तर दूरच राहिले. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेनेने पुढाकार घेत अशा गरजू मध्यमवर्गीय कुटुंबांना दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची मदत केली आहे. डोंबिवली शिवसेना शहरप्रमूख राजेश मोरे यांनी आपल्या प्रभागातील 10 हजारांवर कुटुंबांना दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला घरोघरी जाऊन ही मदत दिली जाणार असल्याची माहिती शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.

तर डोंबिवली पश्चिमेतील युवासेना पदाधिकारी अनमोल म्हात्रे आणि शिवसेना पदाधिकारी बाळा म्हात्रे यांच्यामार्फत महाराष्ट्र नगर आणि देवीचा पाडा प्रभागातील नागरिकांसाठी अवघ्या 1 रुपया किलो दराने दिवाळी फराळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. अवघ्या 1 रुपये किलो दराने साखर, रवा आणि मैदा हे साहित्य गरजू कुटुंबाना देण्यात आले. यासाठी प्रभागातील नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने मोठी गर्दी केलेली दिसून आली. कोरोनामुळे नागरिकांना दिवाळी फराळ बनवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबल्याचे बाळा म्हात्रे यांनी सांगितले.

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवली उद्या (29 ऑक्टोबर) याठिकाणी कोवीड लसीकरण
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 23 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा