कल्याण | ८ सप्टेंबर :
मोहोने येथील शिवनगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या आकर्षक सजावट, कलात्मक देखावे आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांची यशस्वी परंपरा कायम राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंडळाच्या २०२५ मधील ‘एकविरा दर्शन’ या देखाव्याला विविध स्पर्धांमध्ये तब्बल तीन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. (Shivnagari Ganeshotsav Mandal of Mohane Near Kalyan Wins Three More Prestigious Awards)
शिवसेना ठाणे जिल्हा गणेश दर्शन स्पर्धेत २०२५ साली सादर करण्यात आलेल्या ‘एकविरा दर्शन’ या सजावटीने प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी मंडळाला सन्मानचिन्हासह २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. याच सजावटीची दखल घेत सर्वोत्कृष्ट देखावा या स्वतंत्र श्रेणीतही मंडळाला आणखी एक सन्मानचिन्ह आणि १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.
यापूर्वी २०२४ मध्येही मंडळाने उल्लेखनीय यश संपादन केले होते. ‘कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव’ या संकल्पनेवर आधारित देखाव्यास प्रथम क्रमांक आणि सर्वोत्कृष्ट देखाव्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी मंडळाला सन्मानचिन्हासह २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.
मंडळाच्या या सातत्यपूर्ण यशामागे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सजावट आणि देखावा साकारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व कलाकारांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात शिवनगरी मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपादृष्टीची अनुभूती देणारा विशेष देखावा साकारण्यात येणार असून, हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भक्ती, कलात्मकता आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या देखाव्याची भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

