Site icon LNN

कल्याण पश्चिमेत धुराचे साम्राज्य; प्रदूषणाची पातळी धोकादायक, AQI पोहोचला ३९४ वर

कल्याण, दि.11 मार्च :
कल्याण पश्चिम परिसरात आज सकाळपासून सर्वत्र धुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पसरले असल्याचे दिसून येत आहे. या धुरामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तब्बल ३९४ इतका धोकादायक स्तरावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. (Smoke Engulfs Kalyan West; Air Pollution Reaches Dangerous Level as AQI Hits 394)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गांधारी पुलापलिकडील बापगाव भागात काल पहाटे लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला असून तो वाऱ्याच्या दिशेमुळे कल्याण पश्चिम भागात पसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळपासूनच गांधारी, रिंग रोड, गोदरेज हिल, खडकपाडा, आधारवाडी, लालचौकी अशा अनेक भागांमध्ये वातावरण धुरकट दिसत असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

प्रदूषणाच्या या वाढलेल्या पातळीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसनासंबंधी आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला…
कल्याण पश्चिमेत सकाळपासून पसरलेल्या या धुरामुळे परिसरात असलेल्या विशेषतः खडकपाडा भागातील शालेय विद्यार्थ्यांना श्वसनासाठी त्रास जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सकाळी आठ ते साडेआठच्या समोरच्या धुराचा त्रास भयंकर होता, घरामध्ये, शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये,क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना खोकल्यासह, श्वास घेण्यासाठी त्रास झाल्याची माहिती खासगी शाळेच्या शिक्षकाने दिली आहे.

Exit mobile version