Site icon LNN

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित गणित – सायन्स मॉडरेटर सेशन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिवसेना शहर शाखा – डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे आयोजन

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती

कल्याण दि.13 नोव्हेंबर:
शिवसेना कल्याण शहर शाखा (पश्चिम), डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित गणित – विज्ञान विषयावरील कल्याणमधील सर्वात मोठे Moderator Session भव्य उत्साहात पार पडले. ज्याला दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण सभागृह विद्यार्थ्यांनी अक्षरशः खचाखच भरले होते. सभागृहातील सर्व खुर्च्या भरल्यानंतर रंगमंदिरातील पायऱ्यांवर विद्यार्थी बसले होते.

दहावीची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची पायरी समजली जाते. ज्यामध्ये गणित आणि सायन्स हे विषय बहुतांशी विद्यार्थ्यांसाठी काहीसे अवघड समजले जातात. या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, विषयांतील अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित केल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली. या सत्रामध्ये गणित आणि सायन्स विषयातील तज्ञ शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत या दोन्ही विषयांतील मूलभूत संकल्पना, सूत्रे अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्पष्ट केल्या.

या उपक्रमासाठी कल्याण पश्चिमेतील अनेक शाळांमधील शेकडो विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या सत्रातून परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढवणारे आणि अभ्यास अधिक परिणामकारक करणारे मार्गदर्शन मिळाल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या विजया पोटे, विधानसभा संघटक संजय पाटील, आयोजक शहर प्रमुख रवी पाटील, उपशहरप्रमुख सुनील वायले, शिवसेना महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, महिला शहरप्रमुख नेत्रा उगले, माजी सभागृह नेते श्रेयस समेळ, युवासेना लोकसभा अध्यक्ष प्रतिक पेणकर, युवासेनेचे अभिलाष डामरे, सुजित रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनाचा आवाज ऐका आणि निर्णय घ्या – खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद
दहावीची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामूळे ही परीक्षा सोपी जाण्यासाठी हा उपक्रम म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आहे. मात्र दहावीची परीक्षा झाल्यावर पुढे काय करायचे या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्या मनाचा आवाज ऐका आणि योग्य तो निर्णय घ्या अशा शब्दांमध्ये खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आपल्याला काय आवडते, आपली आवड कशामध्ये आहे हे जाणून घेणे सगळ्यात महत्त्वाचे असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी मार्ग निवडला पाहिजे. ज्याच्याकडे कौशल्य आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत खा. डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version