मुंबई दि.15 डिसेंबर :
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत आगामी महापालिका निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आजच महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यास संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये विकासकामे, नवीन घोषणा तसेच प्रशासकीय निर्णयांवर निर्बंध येणार आहेत.
राजकीय पक्षांसह संभाव्य उमेदवारांचेही या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले असून, निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेनंतर निवडणुकीच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.

