Site icon LNN

कल्याण पश्चिमेत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; एकाच दिवसात १०० हून अधिक जणांना चावा

(प्रातिनिधिक छायाचित्र)

११ वर्षीय मुलीसह २५ जणांवर रुग्णालयात उपचार

कल्याण | १० ऑगस्ट
कल्याण पश्चिमेच्या संदीप हॉटेल परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला आहे. कालच्या रविवारी दिवसभरात तब्बल १०० हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

रविवारी दुपारपासून हा भटका कुत्रा गाडीवर बसलेल्या, चालणाऱ्या नागरिकांना पाठीमागून येऊन चावण्याच्या तक्रारी आहेत. अचानक वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे अनेक नागरिकांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे धाव घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एका दिवसात १३० नागरिक श्वानदंशाच्या उपचारासाठी आले. त्यापैकी गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या २५ नागरिकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

या घटनेतील ११ वर्षीय मुलीवर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने तिला मुंबईतील शीव रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना अँटी-रेबीज लस देण्यात आली.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसाढवळ्याही नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना सावध राहावे लागत आहे. कुत्र्यांच्या कळपामुळे पादचारी तसेच दुचाकीस्वारांना धोका निर्माण होत असून, अचानक कुत्रे वाहनांच्या मागे लागल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे.

Exit mobile version