Site icon LNN

विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘मातीचा गणपती’; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

केडीएमसीच्या कार्यशाळेत १२० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव

कल्याण | १९ ऑगस्ट :
गणेशोत्सव म्हटला की उत्साह, भक्ती आणि सजावटीसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. हाच संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पर्यावरण – प्रदूषण नियंत्रण विभागातर्फे कल्याण पश्चिमेतील पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मितीची विनामूल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
(Students Craft Eco-Friendly Clay Ganesha Idols; Spreading the Message of an Environment-Friendly Ganeshotsav)

या कार्यशाळेत तब्बल १२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या हातांनी गणरायाच्या आकर्षक मूर्ती साकारल्या.मातीला आकार देताना विद्यार्थ्यांनी केवळ कलेचा आनंद घेतला नाही, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्वही प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतले.

मूर्तिकार मीनल लेले यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचे महत्त्व, मूर्तीनिर्मितीची शास्त्रशुद्ध पद्धत आणि पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत मार्गदर्शन केले. विसर्जनानंतर उरलेली शाडू माती पुन्हा संकलित करून तिचा पुनर्वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.

यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण रोखणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शन केले. उपायुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता डॉ.शैलेश कुलकर्णी यांचेही या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले.

केडीएमसी, पोदार इंटरनॅशनल हायस्कूल आणि लाभ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने झालेली ही कार्यशाळा कला, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम ठरली.

Exit mobile version