‘ज्ञानेश्वरी’ घराघरांत नव्हे, विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातून मनामनांत; संचालक, शिक्षक, पालक आणि सुरक्षारक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग
कल्याण | १८ जुलै :
ll ज्ञाना म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी l एक तरी ओवी अनुभवावी ll…अर्थातच “ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यातील एक जरी ओवी समजून घेऊन जीवनात उतरवली, तरी जीवनाला योग्य दिशा मिळू शकते.” या पार्श्वभूमीवर आधुनिक शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि वारकरी परंपरेशी जोडणारा एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम कल्याणमधील आचिव्हर्स शाळा आणि महाविद्यालयाने हाती घेतला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयात ‘संकल्प संपूर्ण ज्ञानेश्वरी लेखन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून, या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात ९ हजारांहून अधिक ओव्या लिहून संपूर्ण ज्ञानेश्वरी साकारण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. (Students Handwrite Over 9,000 Verses of the Dnyaneshwari; Achievers College, Kalyan Launches a Unique Cultural and Spiritual Initiative)
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ ३ हजार ५०० विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता संस्थेचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि शाळेच्या सुरक्षारक्षकांनीही त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे हा उपक्रम एका शैक्षणिक संस्थेचा न राहता संपूर्ण शैक्षणिक परिवाराचा आध्यात्मिक सोहळा ठरला. अचिवर्स महाविद्यालयाच्या संस्कृत भाषेच्या शिक्षिका प्रिती मंगेश येलमकर यांच्याद्वारे अधिक महिन्यातील कमला एकादशीपासून हा उपक्रम राबविण्यात आला.
आचिव्हर्स शाळा आणि महाविद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य डॉ. महेश भिवंडीकर यांनी सांगितले की, आजच्या पिढीला भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि वारकरी विचारांची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ ती वाचू नये, तर स्वतःच्या हस्ताक्षरातून लिहावी, समजून घ्यावी आणि तिचा विचार आत्मसात करावा, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला.
त्यांनी पुढे सांगितले की, हाताने लिहिताना प्रत्येक ओवीचा अर्थ विद्यार्थ्यांच्या मनात अधिक प्रभावीपणे रुजतो. त्यामुळे हा उपक्रम केवळ लेखनापुरता मर्यादित नसून संस्कार, चिंतन आणि अध्यात्म यांचा संगम आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना विशेष स्वरूपाची लेखनपत्रिका देण्यात आली होती. त्यावर ज्ञानेश्वरीतील अध्याय आणि ओवी क्रमांक नमूद करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाट्याला आलेल्या ओव्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिल्या. अशा प्रकारे हजारो हस्ताक्षरांचा संगम घडवत संपूर्ण ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण करण्यात आले.
शालेय स्तरावर संपूर्ण ज्ञानेश्वरी हस्ताक्षरातून लिहिण्याचा असा उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, एकाग्रता, आध्यात्मिक विचार आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या अल्पवयात रचलेली ‘भावार्थ दीपिका’ अर्थात ज्ञानेश्वरी ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनमूल्ये, कर्तव्य, मानवता आणि अध्यात्म यांचे अमूल्य मार्गदर्शन करणारी ज्ञानगंगा आहे. हीच ज्ञानगंगा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि वारकरी परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत, यासाठी आचिव्हर्स शाळा आणि महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकाचा विषय ठरत आहे.

