Home ठळक बातम्या आकर्षक रोषणाईने फुलले छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्य

आकर्षक रोषणाईने फुलले छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्य

कल्याण दि. 2 मे :

छ्त्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे जणू काही कल्याण शहराचे हृदयच. आणि याठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी पुतळा आणि त्याला जोडून दिमाखात उभा असणारा प्रभाकर ओक टॉवर म्हणजे शहराचा मानबिंदू. याठिकाणी करण्यात आलेल्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक रोषणाईने छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्य आणखीन खुललेले दिसत आहे.

केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेततील कायापालट अभियानांतर्गत कल्याण- डोंबिवली शहरांमध्ये विविध ठिकाणी शहर सौंदर्यीकरण प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यांची मेघडंबरी आणि त्याला लागून असणाऱ्या प्रभाकर ओक टॉवरला ही आकर्षक अशी फसाद रोषणाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते या रोषणाईचे लोकार्पण करण्यात आले. यात सीनियर वॉल वॉशलाईट, राऊंड स्पॉटलाईट, लाइटिंग कन्‍सोल आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून मंगलोरच्या कॅनरा लायटिंग कंपनीने हे कलात्मक विद्युत रोषणाईचे काम केले आहे.

सुमारे 66 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या प्रभाकर ओक टॉवरचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून येथे नेत्रसुखद अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विविध सणांच्या कालावधीत त्या त्या सणाशी संबंधित त्याच्या रंगछटा सादर केल्या जाणार असून त्याद्वारे शहराचे सौंदर्य अधिक खुलून निघणार असल्याची भावना डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केली.

दरम्यान दुर्गाडी चौक ते भवानी चौक रस्त्यापर्यंत करण्यात आलेल्या तिरंगा एलईडी रोषणाईप्रमाणे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील मुख्य रस्त्यावरही अशाच प्रकारच्या तिरंगा थीममध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी विकासक मे. रॉय रेसिडेंसी प्रा.लि., मे. साकेत ग्रुप, मे. गोपालकृष्ण डेव्हलपर्स, मे. डावखर इन्फ्रास्ट्रक्चर, मे. अमेया एंटरप्राइजेस, मे. शिवोम एंटरप्राइजेस, मे. साईसृष्टी कन्स्ट्रक्शन यांच्या सोबत बोलाविलेल्या बैठकीतील चर्चेनुसार संबंधित विकासकांनी कल्याण पूर्व येथील पूना लींक रोड वरील वरील तिरंगा रोषणाईचे काम सीएसआर फंडातून करून दिले आहे. या नयनरम्य तिरंगा रोषणाईचे लोकार्पणही महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या करण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा