कल्याण दि.29 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण पूर्वेतील 9 उमेदवारांना ए-बी फॉर्मचे वाटप करून आघाडी घेतल्याचे दिसत आहे. कल्याण पूर्वेत भाजपला मिळालेल्या जागानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घातलेला मोठा गोंधळ पाहता या एबी फॉर्म वाटपाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. (The Bharatiya Janata Party (BJP) has distributed AB Forms to these 9 candidates from Kalyan East)
कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड, कल्याण जिल्हा निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष वैभव गणपत गायकवाड, १४२ कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, उद्योगपती संजय गायकवाड, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, नितेश म्हात्रे, विजय उपाध्याय, विजय जोशी, यशोदा माळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी 1)मनीषा अभिमन्यू गायकवाड, 2)हेमलता कैलाश पावशे, 3)सरोज मनोज राय, 4)डॉ. पूजा संजय गायकवाड, 5)स्नेहल संजय मोरे, 6)इंदिरा तरे, 7)रेखा राजन चौधरी, 8)प्रणाली विजय जोशी या महिला तर माजी उपमहापौर विक्रम तरे या एकाच पुरुष उमेदवाराचा समावेश आहे.
पक्षाने दिलेल्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या 9 जणांना ए-बी फॉर्मचे वितरण करण्यात आल्याचे आमदार सुलभा गायकवाड यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच लोकाभिमुख विकास, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम नेतृत्वाच्या बळावर हे सर्व उमेदवार निश्चितच जनतेचा विश्वास संपादन करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान काल परवापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपला सन्मानजनक जागा मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकारी आणि कार्यर्कत्यांना वाटत होता. मात्र कल्याण पूर्वेतील मोजक्या उमेदवारांची नावे बाहेर आल्यानंतर आधी कल्याण पूर्व आणि नंतर कल्याण पश्चिमेत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र त्याला 24 तासही उलटले नाही तोच भाजपने कल्याण पूर्वेतील 9 उमेदवारांना भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एबी फॉर्मचे वाटप केले. आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यातून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भाजपाचे प्रचार प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी या सर्व चर्चांना खोडून काढत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही सर्व कार्यवाही होत असल्याचे स्पष्ट केले.
हे आहेत भाजपचे कल्याण पूर्वेतील अधिकृत उमेदवार…

