Home ठळक बातम्या कल्याणच्या नववर्ष स्वागत यात्रेत ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संकल्पना

कल्याणच्या नववर्ष स्वागत यात्रेत ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संकल्पना

१९ मार्चला रात्री काळा तलाव परिसरात होणार दिपोत्सव

कल्याण दि.१४ मार्च :
गुढपाडव्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या कल्याणातील नववर्ष स्वागतयात्रा यंदा ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित असणार आहे. या अमृत महोत्सवी संकलापनेच्या माध्यमातून देशाच्या ७५ वर्षांतील चमकदार कामगिरी शोभायात्रेच्या माध्यमातून मांडली जाईल अशी माहिती कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर यांनी दिली. नववर्ष स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणकडे यंदा यजमानपद…
गेल्या दोन दशकांपासून कल्याण संस्कृती मंचातर्फे कल्याणातील नववर्ष स्वागतयात्रेचे अतिशय नेटक्या आणि देखण्या पद्धतीने नियोजन केलं जात आहे. तर विशेष म्हणजे कल्याणच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या सामाजिक संस्थेला या स्वागतयात्रेचे यजमानपद देण्याचा शिरस्ता आहे. त्यामुळे यंदाच्या स्वागतयात्रेचे यजमानपद हे रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणकडे सोपवण्यात आल्याचेही ॲड. बुधकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी संकल्पना…
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामूळे केंद्र सरकारकडून सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणात निघणारी नववर्ष स्वागत यात्राही याच संकल्पनेवर आधारित असणार आहे. स्वातंत्र्योत्तरच्या या साडेसात दशकात भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा चित्ररथांच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१९ मार्चला रात्री काळा तलाव परिसरात दिपोत्सव…
तर नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त १९ मार्च रोजी कल्याणच्या ऐतिहासिक काळा तलाव परिसरात नयनरम्य असा दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात येणार आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अर्चना सोमाणी यांनी दिली.

स्वागतयात्रेचा असा असणार मार्ग…
कल्याण पश्चिमेतील सिंडीगेट येथे गणेश पूजन आणि गुढी उभारुन सकाळी साडे सहा वाजता स्वागत यात्रेला प्रारंभ होईल. मग ही स्वागतयात्रा आयुक्त बंगला, महावितरण कार्यालय, संतोषी माता रोड, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, माता अहिल्याबाई होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक, पारनाका, लालचौकी मार्गे नमस्कार मंडळात यात्रेची सांगता होईल.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे…
कल्याण शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या या गुढी पाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेत अधिकाधिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष डाॅ. सुश्रृत वैद्य यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा