भिवंडी दि. 2 डिसेंबर :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी तातडीने मान्य न झाल्यास या विमानतळावरून एकही विमान उड्डाण करू देणार नाही, असा तीव्र इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषदेत दिला. (The demand to name the Navi Mumbai Airport after Loknete D.B. Patil intensifies; Not a single flight will be allowed to operate if the demand is ignored – warns MP Balya Mama)
या पत्रकार परिषदेस नवी मुंबईतील निलेश पाटील, सागर पाटील, गिरीश साळगावकर, धीरज पाटील, रवी मढवी, अतुल म्हात्रे, रोशन पाटील, हिमांशू पाटील, सुशांत पाटील, सर्वेश तरे यांसह विविध भूमिपुत्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दि.बा. पाटील यांच्या नावासाठी १४ सप्टेंबर रोजी भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ आणि जासई गावापर्यंत कार रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी विमानतळाचे उद्घाटन होऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर रोजी स्थानिक भूमिपुत्रांशी बैठक घेऊन दोन ते अडीच महिन्यांत नामांतराचा निर्णय होईल असे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाला ३ डिसेंबर रोजी दोन महिने पूर्ण होत आहेत, तर विमानतळाचे उड्डाण २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारने नामांतराचा प्रस्ताव चर्चेत घेतलेला नाही किंवा कोणताही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे केंद्राचा विलंब हा स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरणारा असल्याचा आरोप खासदार म्हात्रे यांनी केला.
स्थानिक भूमिपुत्रांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी २२ डिसेंबर रोजी भिवंडीतील माणकोली नाका येथून नवी मुंबई विमानतळापर्यंत पदयात्रा – जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. ही पदयात्रा २४ डिसेंबर रोजी विमानतळ परिसरात पोहोचेल. मागणी मान्य न झाल्यास २५ डिसेंबर रोजी विमानतळावरून कोणतेही विमान उड्डाण होऊ देणार नाही, असा ठराव बैठकीत सर्वानुमते करण्यात आल्याची माहिती खा. बाळ्या मामा यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचे सांगत असले तरी दिल्लीत मंत्रालयात चौकशी केली असता असा कोणताही प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेस आला नसल्याचा दावा खासदार म्हात्रे यांनी केला. सरकार जाणूनबुजून चालढकल करत असून त्यामुळे पाचही जिल्ह्यांतील सागरी भूमीपुत्र समाजात प्रचंड रोष असल्याचे त्यांनी सांगितले.
“सरकारकडे अजून २० दिवस आहेत. समाजाचा संताप ओसंडून वाहण्यापूर्वी दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा संघर्ष अपरिहार्य आहे,” असा ठाम इशारा खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी केंद्र सरकारला दिला.

