Home ठळक बातम्या कल्याणच्या डम्पिंगवरील आग अद्याप धूमसतीच; आणखी काही तास लागण्याची शक्यता

कल्याणच्या डम्पिंगवरील आग अद्याप धूमसतीच; आणखी काही तास लागण्याची शक्यता

 

कल्याण दि.17 मार्च :
कल्याणातील बहुचर्चित डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला काल रात्री लागलेली आग अद्यापही धूमसतीच आहे. काल रात्रीपेक्षा सध्या ही आग नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे विझण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता ( The fire at Kalyan’s dumping is still smoldering; Likely to take a few more hours) आहे. एकीकडे वाढत चाललेला उन्हाचा तडाखा आणि प्रचंड मोठ्या भागात पसरलेली आग पाहता कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दल अक्षरशः प्रयत्नांची शर्थ जरताना दिसत आहेत. तर आगीची भीषणता पाहता डम्पिंग ग्राऊंडला लागून असणारा सीएनजी पंप काल रात्रीपासून बंद ठेवण्यात आला आहे.

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंड आणि त्याला लागणाऱ्या आगीचा प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांसाठी तसा काही नवीन नाही. मात्र गेल्या 2 वर्षांत डम्पिंगच्या आगीच्या घटनांमध्ये लक्षणियरित्या घट झाली होती. गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी 2020 नंतर काल रात्री याठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र कालच्या आगीचा प्रकार काहीसा मोठा असून सुमारे 3 ते 4 एकर कचरा परिसरातील कचऱ्याला आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे.

मंगळवारी रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 12 पाण्याच्या टँकरच्या मदतीने विनाखंडपणे अग्निशमन दल या आगीशी झुंजत आहे. तर आगीचे गांभीर्य लक्षात घेता केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे काल रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते. ही आग नेमकी लागली की लावली याबाबत आताच भाष्य करणे चुकीचे असून सखोल चौकशीनंतर ते स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

तर आग नियंत्रणात असून केवळ धूर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र वाऱ्यामुळे पुन्हा ही आग भडकण्याची शक्यता असून 6 गाड्या आणि पाण्याच्या टँकरच्या मदतीने अग्निशमन दल ही आग विझवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करत आहे. ती पूर्णपणे विझण्यासाठी आज संध्याकाळ होऊ शकते अशी प्रतिक्रिया मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी एलएनएनला दिली.

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग; अग्निशमन दल घटनास्थळी

दरम्यान वर्षभराच्या कालावधीनंतर कल्याण डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागली असून हा प्रश्न कायमचा नेमका केव्हा निकाली निघेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

मागील लेखकल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग; अग्निशमन दल घटनास्थळी
पुढील लेखलाचखोरी प्रकरणानंतर महापालिका आयुक्तांकडून 7 प्रभाग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा