Home ठळक बातम्या कचराच उचलला न गेल्याने मच्छी मार्केटमध्ये पसरल्या आळ्या ; व्यावसायिक आणि ग्राहकांचे...

कचराच उचलला न गेल्याने मच्छी मार्केटमध्ये पसरल्या आळ्या ; व्यावसायिक आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात

 

कल्याण दि.14 जून :
कल्याणच्या छाया टॉकीजजवळील मच्छी मार्केमधला कचरा गेल्या 8 दिवसांपासून उचलला न गेल्याने त्याठिकाणी अक्षरशः आळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी याठिकाणी व्यवसाय करणारे मच्छीविक्रेते आणि याठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

कल्याण पश्चिमेला असणारे हे मच्छी मार्केट बरेच जूने असून याठिकाणी 100 हून अधिक मच्छी विक्रेते आणि महिला व्यवसाय करत आहेत. मच्छीबरोबरच याठिकाणी चिकन आणि मटण विक्रीही केली जाते. कल्याणातील महत्वाच्या मार्केटपैकी एक असणाऱ्या या मार्केमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मच्छी, मटण, चिकन विक्री होत असते. साहजिकच त्यामुळे दररोज त्याच्याशी संबंधित टाकाऊ कचराही मोठ्या प्रमाणात पडत असतो.

मात्र गेल्या 8 दिवसांपासून हा सर्व कचरा उचललाच न गेल्याने याठिकाणी अक्षरशः प्रचंड प्रमाणात दुर्गंधी तर पसरली आहेच. पण आता त्याजोडीला हा सर्व कचरा सडू लागल्याने पांढऱ्या रंगाच्या मोठ्या आळ्याही झाल्या आहेत. संपूर्ण मार्केमध्ये या आळ्या पसरल्या असून त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाला वारंवार हा कचरा उचलण्यासाठी कळवले. मात्र त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.

एकीकडे डम्पिंगवर कचरा टाकणे बंद झाल्याने हुरळून गेलेल्या पालिका प्रशासनाने आता अशा प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहीजे. अन्यथा कचऱ्याविरोधातील हे युद्ध जिंकूनही छोट्या छोट्या लढायांमध्ये मात्र पदरी निराशा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा