Home ठळक बातम्या शहाडमध्ये साचलेल्या पाण्यात शाळेची बस अडकली; नागरिकांनी विद्यार्थ्यांची केली सुटका

शहाडमध्ये साचलेल्या पाण्यात शाळेची बस अडकली; नागरिकांनी विद्यार्थ्यांची केली सुटका

एखाद्याचा जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार का?

कल्याण दि.२४ जून :
कल्याण आणि आसपासच्या परिसरात आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते. कल्याण पश्चिमेच्या शहाड परिसरातही रस्त्यावर पाणी साचून त्यात शाळेची एक बस बंद पडली. मात्र उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर एखाद्याचा जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासन या प्रश्नाबाबत जागे होणार आहे का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कल्याण पश्चिमेतील शहाड परिसर सातत्याने अवघ्या काही मिनिटांच्या पावसात जलमय होत आहे. आज दुपारी मात्र मुसळधार पाऊस झाल्याने या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. असे असतानाही शाळेच्या बस चालकाने अति शहाणपणा दाखवत या पाण्यात बस टाकली आणि काही वेळातच रस्त्याचा मधोमध जाऊन ही बस बंद बंद पडली. या बसमध्ये अनेक शालेय विद्यार्थी होते, ही नेमक्या कोणत्या शाळेची बस होती याची माहिती मिळू शकली नाही. मात्र उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बसच्या खिडकीतून एक एक विद्यार्थी सुखरूप बाहेर काढल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान गेल्या पंधरा दिवसात सलग चौथ्यांदा शहाड परिसर जलमय झाला आहे. मात्र त्यानंतरही प्रशासन स्तरावर कोणतीच कारवाई झालेली पाहायला मिळत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. साचलेल्या पाण्यामध्ये एखाद्याचा जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासन जागा होणार का असा उद्विग्न सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. केडीएमसी प्रशासनाला वारंवार या प्रश्नाबाबत विचारणा करूनही हा प्रश्न का सोडवला जात नाहीये की एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी होणार हा खरा सवाल आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा