Home ठळक बातम्या दृष्टी खराब झाली तर काय होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेय – कल्याणात...

दृष्टी खराब झाली तर काय होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेय – कल्याणात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची तुफान फटकेबाजी

कल्याणातील अनिल आय हॉस्पिटलचे खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण दि. २८ ऑगस्ट :
दृष्टी चांगली असेल तर आपण लोकांना चांगल्या मार्गाने पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि माणसाची दृष्टी खराब झाली तर त्याचं काय होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे असे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचे नाव न घेता टोला लगावला. डोंबिवलीतील नामांकित नेत्रतज्ञ डॉ. हेरूर कुटुंबियांच्या कल्याणातील पहिल्या अनिल आय हॉस्पिटलचे आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार डॉ. शिंदे यांनी चांगलीच फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली.

शिंदेंच्या हाताला चांगला गुण आहे…

ज्याप्रमाणे डॉक्टरांच्या हाताला चांगला गुण असला की पेशंट लगेच ठणठणीत बरा होतो. त्याप्रमाणे आज शिंदेंच्या हाताला चांगला गुण असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी त्यांना दाद दिली. तसेच त्याचे सकारात्मक परिणामही आपल्याला महाराष्ट्रभर दिसत आहेत. लोकांना अभिप्रेत असलेले सरकार महाराष्ट्रात आले असून मोठ्या प्रमाणात लोकोपयोगी कामे सुरू आहेत. आपल्यातीलच एक कॉमन मॅन असणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून ते झपाटल्याप्रमाणे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर आपल्या रुग्णालयाकडून लोकांना दृष्टी देण्याचे काम केले जाते. दृष्टी चांगली असेल तर आपण लोकांना चांगल्या मार्गाने पुढे घेऊन जाऊ शकतो. मात्र माणसाची दृष्टी खराब झाली तर त्याचं काय होते हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ठाणे – मुंबईतही अशाच प्रकारे रुग्णसेवा करावी…

तर अनिल आय हॉस्पिटलच्या वाटचालीमध्ये हेरुर कुटुंबीयांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांचाही तितकाच मोठा वाटा आहे. नेत्याने कितीही युद्ध करायचे ठरवले तरी जोपर्यंत सैन्य तयार नसते तोपर्यंत युद्ध जिंकता येत नाही असे सांगत येत्या काळात डोंबिवली कल्याणसोबतच उल्हासनगर अंबरनाथ आणि त्यानंतर ठाणे – मुंबईतही अशाच प्रकारे रुग्णसेवा करावी अशी अपेक्षा खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच अनिल आय हॉस्पिटसारख्या संस्था आणि डॉ. हेरूर कुटुंबीयांसारख्या चांगल्या व्यक्तींची सरकारलाही गरज आहे. येणाऱ्या काळात तळागाळातील लोकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनिल आय हॉस्पिटलने सरकारसोबत काम करण्याची सादही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी घातली.

अनिल आय हॉस्पिटलची रुग्ण सेवेची अविरत ५० वर्षे…
१९७२ मध्ये डोंबिवलीतील लहान क्लिनिकपासून सुरू झालेल्या अनिल आय हॉस्पिटलच्या रुग्णसेवेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ५ दशकांच्या कारकीर्दीत डॉ. हेरूर कुटुंबीयांनी अनिल आय हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हजारो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉ. अनघा हेरूर यांनी दिली. त्यामूळे डोंबिवली पाठोपाठ आता कल्याणातील नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कल्याण पश्चिमेच्या बिर्ला कॉलेज रोडवर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रुग्णालय सेवेत दाखल झाले आहे.

यावेळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह माजी नगरसेवक रवी पाटील, संजय पाटील, सुनिल वायले, छाया वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मागील लेखशहराच्या स्वच्छतेसाठी अभियान राबवावे लागणे हे दुर्दैव – आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे
पुढील लेखमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा