Home ठळक बातम्या कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी : दुर्गाडीवरून बसेस सोडण्यासह केडीएमसीने घेतले हे...

कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी : दुर्गाडीवरून बसेस सोडण्यासह केडीएमसीने घेतले हे महत्वाचे निर्णय

पुढील महिन्याच्या मार्च अखेरीपर्यंत बाहेरगावच्या बसेस सुटणार दुर्गाडी चौकातून

कल्याण दि. 2 डिसेंबर :
आधीच वाहतूक कोंडी आणि बजबजपुरीने गजबजलेल्या कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे लोकांना अक्षरशः नकोसे झाले आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुल कामांचे काही टप्पे पूर्ण होईपर्यंत कल्याण स्टेशन परिसरातील बाहेरगावच्या एसटी, एनएनएमटी, केडीएमटी बसेस दुर्गाडी चौकातून सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच 5 डिसेंबरपासून बाहेरगावच्या बसेस सुटण्याचे हे बदल लागू होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

एसटी,एनएनएमटी, केडीएमटी बसेसबाबत हा महत्वाचा निर्णय…
स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात वाहतूक कोंडीमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे बाहेरगावहून येणाऱ्या एसटी बसेस आता कल्याण स्टेशनला जाणार नाहीत. त्याऐवजी या बसेस गणेश घाट (मुरबाड रोड)आणि गुरुदेव हॉटेल परिसरामध्ये प्रवासी सोडण्याचे आणि घेण्याचे काम करतील.

तर कल्याण एसटी डेपोमधून बाहेरगावी जाणाऱ्या एस टी बसेस या आता गणेश घाट येथून सोडण्यात येतील. यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा दुर्गाडी आणि गणेश घाट परिसरात उपलब्ध करून देण्यात येतील.

केडीएमटी आणि एनएमएमटीच्या या बसेसही दुर्गाडीहून सुटणार…
केडीएमटीच्या पनवेल, वाशी जाणाऱ्या आणि एनएमएमटीच्या कल्याण स्टेशन परिसरात येणाऱ्या सर्व बसेसही आता दुर्गाडीहून सुटणार आहेत. कल्याण स्टेशनवरून दुर्गाडी चौकात किंवा गणेश घाट परिसरात जाण्यासाठी मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मिनी बस केडीएमटी, एनएमएमटी किंवा एसटीच्या असू शकतील अशी माहिती आयुक्त डॉ. भाऊ साहेब दांगडे यांनी दिली.

पुढील मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हे बदल लागू राहणार…
कल्याण स्टेशन ऐवजी दुर्गाडी चौक आणि गणेश घाट परिसरातून सुटणाऱ्या या बाहेरगावच्या बसेस पुढील वर्षीच्या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत सुटतील. डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांपर्यंत हे बदल लागू राहणार असून तोपर्यंत स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे काम बऱ्यापैकी झाले असेल. ज्यामुळे त्याच्या खालून पुन्हा एकदा पूर्वीसारखी वाहतूक सुरू करता येईल असेही डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले.

 

 

स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांबाबतही महत्वाचा निर्णय…
कल्याण स्टेशन परिसरात नागरीकांनंतर रिक्षा चालकांची सर्वात मोठी गर्दी असते. रिक्षांच्या चार चार लाईनमुळेही स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण स्टेशन परिसरात आता रिक्षांच्या केवळ दोन लाईन्स असतील. एक मीटरवर जाणाऱ्या रिक्षांची तर दुसरी शेअरवर जाणाऱ्या रिक्षांची रांग असेल.
तर स्टेशन परिसरात अनधिकृत काळ्या पिवळ्या टॅक्सीनाही प्रतिबंध घालण्यात येणार असून केवळ अधिकृत काळ्या पिवळ्या टॅक्सीनाच दुर्गाडी चौक परिसरात परवानगी असेल अशी माहितीही डॉ. दांगडे यांनी दिली.

कल्याणातील सिग्नल यंत्रणेबाबत झाला हा निर्णय…
कल्याणात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेल्या चौकात असणारे ट्रॅफिक आयल्यांडस् काढण्याची सूचना कल्याण ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात आली आहे. या सूचनेची वस्तुस्थिती तपासून केडीएमसी प्रशासन त्याबाबत कार्यवाही करेल. तसेच येत्या 15 दिवसांत या चौकांतील रस्ते दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग आणि इतर मार्किंग करून व्यवस्था करून दिली जाईल. त्यानंतर वाहतूक पोलीस विभागाकडून हे सर्व ट्रॅफिक सिग्नल्स सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करतील असेही आयुक्त डॉ. दांगडे म्हणाले.

बेवारस वाहनांच्या मालकांना नोटीस देणार…
कल्याण डोंबिवली शहरांतील रस्त्यांवर अनेक बेवारस वाहने उभी असून त्यामुळेही वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांवर मालकांच्या नावे नोटीस लावून दिलेल्या मुदतीत ही वाहने त्यांनी हलवले नाही तर त्या सर्व वाहनांचा लिलाव करून येणारे पैसे शासनाच्या तिजोरीत जमा केले जातील असा सज्जड इशाराही डॉ. दांगडे यांनी यावेळी दिला.

दरम्यान केडीएमसी मुख्यालयात झालेल्या या बैठकीला केडीएमसी अधिकारी, वाहतूक पोलीस, एसटी अधिकारी, परिवहन अधिकारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा