डोंबिवलीपाठोपाठ कल्याण पश्चिमेत झाला भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा
कल्याण दि.21 डिसेंबर :
महाराष्ट्रात 288 जागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 236 ठिकाणी भाजपने निवडणूक लढवली असून त्यामध्ये भाजपने 134 ठिकाणी भाजपाने महाविजय मिळवला असून भाजप ही तळागाळापर्यंत पोहचलेला पक्ष आहे. भाजपचा कार्यकर्ता हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्यानेच इतके मोठे यश भाजपाच्या पदरात पडले अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. कल्याण पश्चिमेतील यंशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. (This landslide victory was secured by party workers who reached the grassroots,” said State President Ravindra Chavan)
पंधरा तारखेला होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून जिल्हाभरात कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक भागात कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीसाठी सज्ज करण्यासाठी हे मेळावे घेतले जात आहेत. याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिम येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला होता. आज डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम या भागांमध्येही कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना वेळ देणे, त्यांना चार्ज करणे आणि थेट संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याने या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रात २८८ ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. यापैकी २३६ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यापैकी १३४ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, हे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे द्योतक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजप ही तळागाळात काम करणारी आणि गावोगावी, बूथ लेव्हलपर्यंत संघटन मजबूत करणारी पार्टी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार “महाराष्ट्रात ५१ टक्के लढाई आपल्याला जिंकायची आहे” या भूमिकेनुसार मॅन-टू-मॅन संपर्कावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपकडून प्रभावीपणे सुरू असून, त्याचा सकारात्मक परिणाम निवडणूक निकालांमध्ये दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही भागांत बूथ लेव्हलवर केलेले नियोजन, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे व्हिजन या बाबी इथल्या विजयामध्ये उल्लेखनीय ठरल्याचे ते म्हणाले.
तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी विश्वास व्यक्त केला. “एक दिवस तुम्ही मतदान करा, पाच वर्षे मी तुमच्यावर लक्ष ठेवतो,” असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. नागरिकांनी त्यांच्या या विनंतीला प्रतिसाद दिल्यामुळेच महाराष्ट्रात भाजपला हे यश मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

