Site icon LNN

शिवसेनेचे डोंबिवलीतील 3 उमेदवारही बिनविरोध ;कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी – रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी बिनविरोध विजयी

डोंबिवली दि.1 जानेवारी :
भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच आपले खाते उघडले असून एकच पॅनेलमधून तिघे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेची राजकीय रणनिती यशस्वी ठरली असून पॅनेल क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी बिनविरोध निवडून येणार आहेत. तर यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या तिन्ही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे.

यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याचे हे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.

Exit mobile version