Home ठळक बातम्या केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची वेळ – जलसंपदा मंत्री जयंत...

केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची वेळ – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

डोंबिवली दि. 18 डिसेंबर :
केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठे नुकसान केलंय. ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची वेळ आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आलीये. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठे कमी पडणार नाही मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे डोंबिवलीत आयोजित शरद महोत्सवाचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्येही याचीच पुनरावृत्ती होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींविरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पॅरिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होतं. दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे त्यात इमपरिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचे तर कोर्टात मात्र या डेटामध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचे सांगितले. आणि आता म्हणतात की डेटाच उपलब्ध नाहीये या सर्व केंद्र सरकारच्या भाजपच्या भूलथापा असल्याची टिकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

तर शासकीय परीक्षामधील पेपरफुटीबाबत बोलताना ते म्हणाले की एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नसल्याने वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला. एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते. दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती. त्यात आरोग्य विभागात ज्यांनी गोंधळ घातला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही माहिती कळली. याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

केडीएमसीच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की काही नगरसेवक हे राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येईल. तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या ही लक्षणीय वाढलेली असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आठवडाभर चालणार शरद महोत्सव…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त या शरद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पूर्वेतील नेहरू मैदान येथे 17 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात कला-संस्कृती, परंपरा, क्रीडा आणि गुह उद्योगावर भर देण्यात आला असून महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे सुमारे 80 स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कल्याण महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड यांनी दिली.

यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी,भरत गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 18 डिसेंबर रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 19 रुग्ण तर 18 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा