कल्याण दि.21 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कोवीडबाधित कर्मचाऱ्यांसाठी केडीएमसी प्रशासनाने राखीव बेड ठेवण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहिले आहे.
कल्याण डोंबिवलीत सध्या मोठ्या प्रमाणात कोवीड प्रादुर्भाव होत असून महापालिकेचे सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, अधिकारी दिवस रात्र त्याविरोधात काम करत आहेत. त्यातच पालिकेचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी कोवीडबाधित होत असून त्यांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याचे रवी पाटील यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आणि खासगी कोवीड रुग्णालयांमध्ये काही बेड पालिका कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केल्याचे रवी पाटील म्हणाले.
दरम्यान कामगार संघटनेच्या या मागणीनंतर महापालिका आयुक्तांनी एक पत्रक काढत कोवीडबाधित कर्मचाऱ्याला योग्य त्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतात की नाही याची दक्षता संबंधित खातेप्रमुखांनी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईकानाही लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याबाबत खातेप्रमुखांनी लक्ष देण्याचे पालिका आयुक्तांनी निर्देशित केले आहे.