कल्याणातील एमसीएचआय प्रॉपर्टी प्रदर्शनात वाचली विकासकामांची यादी
कल्याण, दि. 19 एप्रिल :
कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मेट्रो, रिंगरोड, डबल डेकर रस्ते, नवीन कनेक्टिव्हिटी मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, यामुळे भविष्यात कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Traffic Congestion in Kalyan-Dombivli to Ease with Metro, Ring Road and Double-Decker Road Projects: Deputy CM Eknath Shinde)
कल्याण येथे आयोजित एमसीएचआय प्रॉपर्टी प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विकासकांना शासनासोबत समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. “तुमचे सर्व प्रश्न सोडवू, मात्र घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मेट्रो-5 प्रकल्पाचे टेंडर लवकरच निघणार असून शिळफाटा रस्ता तीन पदरी करण्यात येणार आहे. तसेच रांजणोली मार्गाचेही रुंदीकरण सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक बाहेर वळवण्यासाठी रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय जेएनपीटी-वडोदरा महामार्गाला कल्याणजवळ कनेक्टिव्हिटी देण्याची विनंती कल्याण डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिकांनी केली आहे. तिचा धागा पकडत आपण संबंधितांना त्याबाबत कल्याणला अप्रोच देण्याबाबत नक्कीच सूचना करू असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
ठाणे-पडघा 8 लेन मार्ग, डबल डेकर रस्ते अशा प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले. ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटून जाईल असे ते म्हणाले.
पाणीपुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी नवीन काळू धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले.
विकासकांनी शहरातील रस्ते, सुविधा, सार्वजनिक कामांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करताना “महापालिका आणि शासन आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देईल,” असे त्यांनी सांगितले.
तसेच कल्याण स्टेशन सॅटीस प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून, मुंबई महानगर प्रदेश वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्याचेही निर्देश त्यांनी शासकीय यंत्रणांना दिले.

