Site icon LNN

‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत डोंबिवलीत वृक्षारोपण; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचाही सहभाग

डोंबिवली | ५ जून :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या आवाहनाला प्रतिसाद देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा डोंबिवली पूर्व शहरच्या वतीने विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डोंबिवलीतील वै. संतश्रेष्ठ हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. (Tree Plantation Drive Held in Dombivli Under ‘Ek Ped Maa Ke Naam’ Campaign; BJP State President Ravindra Chavan Participates)

यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये धरतीला मातेसमान स्थान देण्यात आले आहे. आईचे ऋण कधीही फेडता येत नाही, मात्र तिची सेवा नक्कीच करता येते. याच भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड़ माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, मागील वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लावण्यात आलेल्या झाडासोबत यावेळी उपस्थितांनी सेल्फी घेत त्या झाडाच्या वाढीचा आढावाही घेतला. त्यामुळे केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन आणि जतन करण्याचाही संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षण, हरित शहर उभारणी आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजप गटनेते शशिकांत कांबळे, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, नगरसेविका रंजनाताई पेणकर, नगरसेवक दिपेश म्हात्रे, महेश पाटील, नंदू म्हात्रे, विनोद काळण, मंदार टावरे, जालिंदर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version