Home ठळक बातम्या अंबरनाथच्या नेवाळी परिसरात पुन्हा अग्निकांड; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेली...

अंबरनाथच्या नेवाळी परिसरात पुन्हा अग्निकांड; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेली हजारो झाडे भस्मसात

अंबरनाथ दि.15 नोव्हेंबर :

अंबरनाथच्या नेवाळी परिसरातील मांगरूळ डोंगरावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेली हजारो झाडे आगीमध्ये भस्मसात झाली आहेत. अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावली असल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकारामुळे वृक्ष आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वनखात्याच्या निष्काळजीपणामूळे हा प्रकार घडल्याची उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

साधारणपणे 3 वर्षांपूर्वी अंबरनाथच्या नेवाळी येथील मांगरूळ परिसरातील डोंगरावर लोकसहभागातून हे हजारो वृक्ष लावण्यात आले. सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेंतर्गत खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही झाडं लावली होती.

नेवाळी परिसरातल्या तीन टेकड्यांवर सुमारे एक लाख झाडांची लागवड करण्यात आली होती. यानंतर काही दिवसांतच या झाडांना आग लावल्याची घटना घडली. मात्र त्यावेळी आगीची झळ बसलेल्या अनेक झाडांना वाचवण्यात वनविभागाला यश आलं. परंतु आता बुधवारी रात्री पुन्हा एकदा समाजकंटकांनी या झाडांना आग लावली. त्यामध्ये दोन टेकड्यावरील हजारो वृक्ष संपूर्णपणे जळून खाक झाले असून लोकसहभागातून लागवड केलेली तब्बल ७० टक्के झाडं जळाली आहेत. त्यामुळे वृक्ष आणि पर्यावरणप्रेमींनीही या घटनेबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वनविभागाच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत घडलेल्या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच एकीकडे कोट्यवधी वृक्ष लागवडीच्या बाता मारणाऱ्या सरकारला त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेता येत नसेल तर त्यांनी तसं आम्हाला सांगावं असेही खासदार शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*