Site icon LNN

दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच उजळले टिटवाळ्यातील आदिवासी पाडे; केडीएमसीच्या पथदिव्यांमुळे अनेक वर्षांचा अंधार दूर

आदिवासी बांधवांच्या मागणीला आयुक्त अभिनव गोयल यांचा सकारात्मक प्रतिसाद; विद्युत विभागाची वेगवान कार्यवाही, अवघ्या काही आठवड्यांत पथदिवे कार्यान्वित

कल्याण | ६ नोव्हेंबर
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि आशेचा सण! याच दिवाळीच्या पूर्वसंध्येला टिटवाळा परिसरातील आदिवासी पाड्यांमध्येही खऱ्या अर्थाने प्रकाशाची दिवाळी साजरी झाली. अनेक दिवसांपासून पथदिव्यांच्या अभावामुळे अंधारात असलेल्या या आदिवासी वस्त्यांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने पथदिवे कार्यान्वित केल्याने संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्तांनी दिलेले आश्वासन अवघ्या काही आठवड्यांत पूर्ण झाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलला आहे. (Tribal Settlements in Titwala Light Up Ahead of Diwali; KDMC Streetlights End Years of Darkness!)

काही आठवड्यांपूर्वी टिटवाळा परिसरातील विविध आदिवासी पाड्यांवरील नागरिकांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली होती. आपल्या वस्त्यांमध्ये पथदिव्यांची सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची व्यथा त्यांनी आयुक्तांसमोर मांडली होती. विशेषतः अंधारामुळे ये-जा करताना होणारी गैरसोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न याकडे लक्ष वेधत या भागात पथदिवे बसविण्याची मागणी करण्यात आली होती.

आदिवासी बांधवांची ही समस्या समजून घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर पथदिवे बसविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाला तातडीने आदिवासी पाड्यांवर १०० पथदिवे बसवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांच्या निर्देशानंतर विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाहीला वेग देण्यात आला. विभागाने विलंब न करता विविध आदिवासी पाड्यांमध्ये पथदिवे बसविण्याचे काम हाती घेतले. विशेष म्हणजे, अवघ्या काही आठवड्यांत हे काम पूर्ण करून दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व पथदिवे कार्यान्वित करण्यात आले.

पथदिव्यांसोबतच आदिवासी बांधवांच्या आयुष्यातही प्रकाश!..
इतके दिवस रात्रीच्या अंधारामुळे होणारी गैरसोय आता दूर झाल्याने आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपल्या वस्त्या प्रकाशाने उजळलेल्या पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद खऱ्या अर्थाने अनमोल होता. प्रशासनाकडे मांडलेली मागणी केवळ ऐकून न घेता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही झाल्याचा आनंद आदिवासी बांधवांनी व्यक्त केला.

आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण केल्याबद्दल आदिवासी नागरिकांनी त्यांचे तसेच विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रशासनाची संवेदनशीलता, नागरिकांच्या समस्यांची तत्पर दखल आणि वेळेत पूर्ण झालेली कार्यवाही यांचे हे सकारात्मक उदाहरण ठरले आहे. दिवाळीच्या प्रकाशपर्वात टिटवाळ्यातील आदिवासी पाड्यांमध्ये उजळलेले हे पथदिवे केवळ रस्त्यांवरील अंधार दूर करणारे नसून, प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारे ठरले आहेत.

आदिवासी पाड्यांमध्ये प्रकाशाची नवी पहाट…
📍 एकूण आदिवासी पाडे : २२
२०२४ ते २०२६ या कालावधीत कार्यान्वित पथदिवे : १८५

२०२६-२७ साठी प्रस्तावित पथदिवे :१००

५ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्यान्वित ५० पथदिवे
| आदिवासी पाडा / परिसर | पथदिव्यांचे पोल |

| ठाकूर पाडा | ६ |
| गणेश विद्यालय, एमटीडीसीजवळील आदिवासी पाडा | ८ |
| गणेश मंदिराजवळील आदिवासी पाडा | ११ |
| गणेशवाडी दर्गा परिसर | ११ |
| मिलिंद नगर (बिर्ला कॉलेज मागे) | २ |
| इंदिरानगर | ३ |
| वाघमारे आळी | ४ |
| कातकरी वस्ती, कल्याण | १ |
| आधारवाडी जेलमागील वस्ती | ४ |
| *एकूण*| *५०*|

पुढील नियोजन : उर्वरित प्रस्तावित पथदिवेही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

Exit mobile version