Home ठळक बातम्या कल्याणातील तिरंगा रॅली : हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

कल्याणातील तिरंगा रॅली : हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

 

५ हजारांहून अधिक जण झाले सहभागी

कल्याण दि. १२ ऑगस्ट :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि हर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. कल्याणच्या शाळा, कॉलेजमधील हजारो विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, सामाजिक संस्था आणि नामांकित नागरिक सहभागी झाले होते.

देशाच्या स्वातंत्र्याचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून त्याचे औचित्य साधून केंद्र सरकारतर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. तर याच अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याणात आज केडीएमसी, पोलीस प्रशासन ,सामाजिक संस्थांतर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजपासून या तिरंगा रॅलीची सुरुवात होवून खडकपाडा सर्कल, आधारवाडी सर्कल, दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक आणि महापालिका मुख्यालयावरून सुभाष मैदान येथे या रॅलीचा समारोप झाला.

विशेष म्हणजे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असणाऱ्या ‘विविधतेतील एकतेचे’ अत्यंत सुंदर असे दर्शन आज कल्याणात निघालेल्या या रॅलीमध्ये घडले. देशातील विविध समाजाचे नागरिक आपल्या पारंपरिक वेशामध्ये या रॅलीत सहभागी झाले होते. त्यासोबतच महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लेझीम, ढोल ताशासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या बँड पथकाने वाजवलेल्या सुमधुर देशभक्तीपर गाण्यांनी सर्वांची मने जिंकली. तर विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर घर तिरंगा आदी घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भरून गेला होता.

एकीकडे आकाशातून धुंवाधार बरसणारा वरुण राजा तर दुसरीकडे या पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांकडून दिल्या जाणाऱ्या देशभक्तीपर घोषणांची बरसात असा आगळा वेगळा मिलाफ आज पाहायला मिळाला.

या रॅलीमध्ये बिर्ला कॉलेजचे नरेशचंद्र, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परिमंडळ डीसीपी सचिन गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, केडीएमसीचे सचिव संजय जाधव, इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा