Home ठळक बातम्या आगामी निवडणूक ही बाबासाहेबांचे संविधान विरुद्ध नरेंद्र मोदी – छगन भुजबळ

आगामी निवडणूक ही बाबासाहेबांचे संविधान विरुद्ध नरेंद्र मोदी – छगन भुजबळ

कल्याण दि.14 जानेवारी :
आगामी निवडणूक ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान विरुद्ध नरेंद्र मोदी अशी असणार असे सांगत कल्याणात झालेल्या राष्ट्रवादीच्या संकल्प मेळाव्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. कल्याण पूर्वेत झालेल्या सभेमध्ये विधिमंडळ गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींची भाषणे झाली. या सर्वांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार आणि शिवसेनेवर खरमरीत टिका केली.

बाबासाहेबांचा कायदा तुम्ही मोडू पाहताय. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला काही मर्यादा होत्या. आता या सरकारने आणलेली आणीबाणी ही महाआणीबाणी आहे. ती सैराट सुटल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रसिद्धीमाध्यमांवर प्रचंड दबाव आहे. यांच्याविरोधात बातम्या देणाऱ्यांना काढून टाकले जात आहे. किती ही दादागिरी? आल्याबरोबर यांनी सर्व संस्था मोडीत काढल्या. 56 इंचाची छाती अलोक वर्मासमोर थरथरल्याचे सांगत मला का पकडलं हे मला माहित नाही आणि त्यांनाही माहीत नाही. आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून समाजात वातावरण तापवायचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघातही छगन भुजबळ यांनी यावेळी केला.

तर मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे, पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्याकडून निधी देताना भेदभाव करणे अपेक्षित नाही. आम्ही सरकारमध्ये असताना अशा प्रकारचा कारभार केला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शिवसेना- भाजप जनतेला आणखी किती काळ फसवणार याचे आत्मचिंतन करा. लोकं काही दुधखुळी नाहीयेत. असहिष्णुतेचे असे वातावरण आमच्या काळात कधी पाहायला मिळणार नाही. शरद पवारांसारखे राज्यकर्ते कुठे आणि गाजरे दाखवणारे आताचे राज्यकर्ते कुठे? जनतेच्या शॉर्ट मेमरीचा फायदा सेना भाजपवाले घेत असल्याचे सांगत सध्याच्या राज्याच्या मंत्रीमंडळात बोगस डिग्री असणाऱ्यांना मंत्रीपदं देण्यात आल्याचा गंभीर आरोपही अजित पवार यांनी केला.

तर नरेंद्र मोदींनी दिवसाढवळ्या मोदींनी देशातील प्रत्येक नागिरकाच्या खिशातून दिड लाख रुपयांची लूट केली आहे. आणि ते सांगत होते की ना खाऊंगा ना खाने दूगा असे टीकास्त्र यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोडले. अवघ्या 5 मंत्रीपदाच्या तुकड्यावर बाळासाहेबांची स्वाभिमानी शिवसेना लाचार झाली. कुत्र्याच्या भांडणाप्रमाणे सेना भाजपमध्ये सध्या भांडणे लागली आहेत. नखं गेलेला आणि दात गेलेल्या वाघासारखी शिवसेनेची अवस्था झाली असल्याचे सांगत मुंडे यांनीही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सेना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*