केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती
नवी दिल्ली, दि. 3 फेब्रुवारी :
कल्याण – मुरबाड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजूरी दिली असून जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे. तर ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर मुरबाड रेल्वेमार्गासाठी निविदा काढण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
त्याचबरोबर पहिल्या टप्प्यातील कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणे असे दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणीही रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली असून रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
तब्बल १७० वर्षांनंतर पूर्ण होणार यांचे स्वप्न…
भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे गाव आहे. मात्र या गावाला रेल्वे पोचण्याचे स्वप्न तब्बल १७० वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. अनेक वर्ष या प्रकल्पासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मुरबाड रेल्वेला हिरवा कंदील मिळाला असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेसाठी महाराष्ट्राच्या वाटा उचलण्यास मान्यता दिल्यामुळे हा रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात येणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणे मार्ग…
जमीन अधिग्रहणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन दिवसांत मध्य रेल्वेला पत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. हे अधीग्रहण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची निविदा काढण्यात येऊन त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्याचबरोबर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणेपर्यंत दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली असून त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
अधिग्रहणणासाठी सर्वपक्षीय नेते – लोकप्रतिनिधींना सोबत घेणार…
कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन येत्या दीड महिन्यांत ही जमीन अधीग्रहण करण्याचा प्रयत्न आहे. तर सुमारे ८० टक्के जमीन अधीग्रहीत झाल्यावर निविदा काढून काम सुरू होईल. २०२४ पूर्वी काम सुरू होणे अपेक्षित असून या मार्गासाठी ९६० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देण्यात आल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.
कल्याण स्टेशनचे सुशोभिकरण…
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर विमानतळाप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकाच्याविकास- सुशोभिकरणाला मंजुरी मिळावी यासाठी आपल्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.