Home कोरोना 3 जानेवारीपासून केडीएमसीतर्फे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण; या केंद्रांवर मिळेल...

3 जानेवारीपासून केडीएमसीतर्फे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण; या केंद्रांवर मिळेल लस

कोवीन पोर्टलवर आजपासून नोंदणीला सुरुवात

 

कल्याण -डोंबिवली दि.1 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे आता 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार असून येत्या सोमवारी 3 जानेवारी 2022 पासून त्याला सुरुवात होणार आहे. 2007 हे किंवा त्यापूर्वीचे जन्मवर्ष असणारी मुलं लस घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने ही लस दिली जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबरद्वारे मुलांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा आजपासून सुरू करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधाही मुलांसाठी उपलब्ध असणार आहे. यावेळी येताना मुलांनी कागदपत्रांसह स्वतः चा किंवा पालकांचा मोबाईल जवळ बाळगणे आवश्यक आहे.

केडीएमसीच्या या केंद्रांवर मिळणार लस…

1 .रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम

2. शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम

3.सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व

4. शक्तिधाम कोळसेवाडी, कल्याण पूर्व

5.आर्ट गॅलरी, कल्याण पश्चिम

6.मोहने लसीकरण केंद्र विराट क्लासिक, यादव नगर रोड,आंबिवली

या लसीकरण केंद्रांवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) उपलब्ध राहणार आहे.

लसीकरणासाठी हे कागदपत्रे आणणे बंधनकारक…

लसीकरणास येताना जन्मदाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधारकार्ड जवळ बाळगणे अनिवार्य राहील. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही कोविड लसीकरण सुविधा 3 जानेवारी 2022 पासून उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.

5 कॉमेंट्स

Leave a Reply to Prabhakar Nandu Jadhav प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा