Home ठळक बातम्या कल्याण,अंबरनाथ तालुक्यातील गावांची पाणी प्रतीक्षा संपली; जलजीवन मिशनमधून मिळणार पाणी

कल्याण,अंबरनाथ तालुक्यातील गावांची पाणी प्रतीक्षा संपली; जलजीवन मिशनमधून मिळणार पाणी

 

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण – अंबरनाथ दि. 4 मे :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातील विविध गावांसाठी लवकरच निविदा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांची अनेक दशकांची पाणी प्रतीक्षा संपली असून या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ही गावे पाण्याच्या बाबतीत संपन्न होणार आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना राबवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. त्या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी अशा योजना मंजूर करून  घरोघरी पाणी देण्याचा  खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे. इतकेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या मलंगगड भागात पाणी पोहोचवण्यासाठी लाखो रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून घेतली आहे. या  मोहिमेचा पुढचा भाग कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांकडे पाहिले जात होते.

पाणी योजनांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी खा. डॉ.  श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित गावांची पाहणी करत त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही तयार केला होता. ही  प्रक्रिया वेगाने पार पाडल्यानंतर आता लवकरच जीवन मिशन अंतर्गत लवकरच कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध गावांच्या नळपाणी योजनेसाठी निविदा जाहीर केल्या जाणार आहेत. तर ही पाणी पुरवठा योजना सुरू होण्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी जिल्हा परिषद सी ई ओ भाऊसाहेब दांगडे यांचे विशेष आभार मानले.

ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील पिंपरी कर्म नगरी तर कल्याण तालुक्यातील खोणी (खोणी, खोणी वडवली, खोणी अंताली), म्हारळ बु, पाली अशा एकूण चार योजनांस रु ५.१३ कोटी रकमेची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून या चार योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून मानसून पुर्वी या योजना कार्यादेश देऊन कामे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

दरडोई खर्चाच्या निकषांपेक्षा जास्त किंमत असणार या योजनांचा प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत त्याअनुषंगाने कल्याण तालुक्यातील शिरढोन, वडवली (शिरढोन) व अंबरनाथ तालुक्यातील पोसरी शेलार पाडा, चिरड अशा एकूण ३.६८ रुपये किमतीच्या चार योजना दरडोई खर्चाच्या निकषांपेक्षा जास्त असल्याने शासनास प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आल्या आहेत. या योजनांस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यावर निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कार्यादेश देण्यात येतील, अशी माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

तसेच जिल्हा परिषदेमार्फत २ कोटी पर्यंतच्या योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात येते. तर २ कोटी पेक्षा जास्त किमतीच्या योजनांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात येते. त्या अनुषंगाने कल्याण तालुक्यातील म्हारळ खुर्द, वरप आणि कांबा अशा एकूण ११.४४ कोटी रकमेच्या तीन योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सादर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनांना तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे.

५ कोटी पेक्षा जास्त किंमत असणान्या योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येते. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत नेवाळी, मांगरूळ खरड, अशा तीन गावे व १४ पाडे मिळून १२.५० कोटी रकमेच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पुढील अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे सादर करण्यात आला आहे. या योजनेस सुद्धा तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मलंगगड वाडी आणि 6 गावे मिळून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली होती. या योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तथापि निविदेचा देकार जास्त असल्याने पुनश्च सुधारित दराने अंदाजपत्रक तयार करून रुपये ७.८२ कोटी रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी ही योजना शासनास सादर करण्यात आली आहे. तसेच कल्याण तालुक्यातील दहिसर घोटेघर योजनेतील बाळे, नारीवली, वाकळण आणि बांभार्ली या ४ गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस ३.७८ कोटी रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता जिल्हा पाणी व स्वच्छता समितीकडून देण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यात येणार आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत एकूण ४४.३६ कोटी किंमतीची कामे कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांमध्ये प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे मान्सून पूर्वी सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

तर पर्यटन विकास योजनेअंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील मलंग वाडी पहाडावर पाणी साठवण बंधारे दुरुस्ती आणि मोठ्या विहिरीची दुरुस्तीची रु ६८.६१ लाखांची दोन कामे मंजूर असून या दोन्ही कामांचे कार्यादेश देण्यात आले असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामेही मान्सून पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला ५५ लिटर प्रति मानसी प्रमाणे नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत केली जाते.

मागील लेखकल्याणात आज भोंग्यविनाच अजान ; पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन
पुढील लेखवीज बिलांबाबत येणाऱ्या बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नका – महावितरणचे ग्राहकांना आवाहन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा