ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या 38 पोलीस ठाण्यात मिळवला पहिला क्रमांक
कल्याण, दि.23 डिसेंबर :
नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासह पोलीस प्रशासनाबाबतचे नकारात्मक चित्र दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित “व्हिजिट माय पोलीस स्टेशन” उपक्रमात कल्याणचे महात्मा फुले पोलीस ठाणे अव्वल ठरले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या 38 पोलीस ठाण्यांपैकी पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 मधील एमएफसी पोलीस ठाण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्यासह गोपनीय शाखा तसेच पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी नागरिकांशी उत्कृष्ट संवाद साधत पोलीस कार्यपद्धती आणि प्रक्रियेची सखोल माहिती करून दिली. त्याबद्दल या पोलीस ठाण्याला पहिला क्रमांक देऊन गौरवण्यात आले आहे. (“Visit My Police Station” Initiative: Kalyan’s Mahatma Phule Police Station Tops the List)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा प्राधिकरण, ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील 38 पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या महिन्या हा उपक्रम राबविण्यात आला.
नागरिकांमधील पोलिसांविषयीची अनावश्यक भीती दूर करणे, पोलिसांची कार्यपद्धती समजावून देणे, तसेच विविध कायदेशीर जागरूकता निर्माण करणे या हेतूने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. जवळपास अडीच ते तीन हजार नागरिकांनी प्रत्यक्ष महात्मा फुले पोलीस ठाण्यातील प्रत्येक विभागाला भेट देत त्याची कार्यपद्धती, कायदे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सुरू केलेले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे आधारवड ॲप, पोलीस मित्रॲप, हेल्पलाइनबाबत सखोल माहिती जाणून घेतली.
ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मडके, जानू पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ या अधिकारी वर्गासह या उपक्रमात विशेष योगदान देणारे गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जगदीश महाजन, साहेबराव माळी, भरत धिरडे, पोलीस शिपाई राजेंद्र पानसरे तसेच महात्मा फुले पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांनी नागरिकांशी उत्कृष्टपणे संवाद साधला.
या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा प्राधिकरण, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांनी सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.

