Site icon LNN

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नागरिकांसाठी 29 नोव्हेंबर 2025 रोजी ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रम

अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन

कल्याण दि.28 नोव्हेंबर :
पोलीस अधिकारी आणि पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये असणारी अनावश्यक भिती कमी करण्यासह समाजातील पोलिसांबद्दलचे नकारात्मक चित्र बदलण्याच्या उद्देशाने उद्या 29 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात “व्हिजिट माय पोलीस स्टेशन” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरीकांना पोलीस ठाण्याची माहिती,येथील कार्यपद्धती आणि इतर महत्वाची माहिती दिली जाणार आहे. (‘Visit My Police Station’ initiative on 29th November at Mahatma Phule Chowk Police Station)

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा प्राधिकरण, ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्या सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा उपक्रम होणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांमधील संवाद अधिक दृढ करणे हा आहे. नागरिकांच्या तक्रारी – अडचणी यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देणे, तसेच नागरिकांना आवश्यक कायद्यांची जागरूकता निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख घटक असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. परदेशी यांनी केले आहे.

तसेच महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिक, सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, इंजिनीयर तसेच खासगी, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह सामान्य नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे.

भावी सण, उत्सव,बंदोबस्ताच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व नागरिकांनी एकत्र काम करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाद्वारे सकारात्मक संवाद साधला जाणार आहे. विविध विषयांवर नागरिकांना थेट पोलिसांशी चर्चा करण्याची संधी यामध्ये उपलब्ध होणार आहे.

त्यामूळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांनी केले आहे.

Exit mobile version