Site icon LNN

अवघ्या ८ दिवसांत वालधुनी उड्डाणपुल दुरुस्तीचे काम पूर्ण; पुढची 5 वर्षे कंत्राटदारावर असणार मेंटेनन्सची जबाबदारी

कल्याण दि.30 डिसेंबर :
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने वालधुनी उड्डाणपुलाची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अवघ्या 8 दिवसांत ही दुरुस्ती पूर्ण करून हा उड्डाणपूल सोमवारपासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.(Waldhuni Flyover Repair Completed in Just 8 Days; Maintenance Responsibility with Contractor for Next 5 Years)

…म्हणून काम 8 दिवसांत झाले पूर्ण
या निर्णयामुळे कल्याण – डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शेजारील शहरांतील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुरुस्ती कामासाठी महानगरपालिकेने सुरुवातीला २० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत पुल २० दिवस बंद ठेवण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडे मागितली होती. मात्र, 24 तास सुरू असलेले काम, अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या तैनातीमुळे हे काम अपेक्षेपेक्षा वेगाने पूर्ण करण्यात आले.

इतर किरकोळ कामे पुढील दोन आठवड्यांत…
विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावरील मुख्य दुरुस्ती काम पूर्ण झाले असून पदपथ दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच इतर किरकोळ कामे पुढील दोन आठवड्यांत पुलावरील वाहतूक सुरू ठेवून पूर्ण करण्यात येणार आहेत.

5 वर्षे रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर…
या दुरुस्ती कामाचे मुख्य कंत्राट शाह इंजिनिअर्स यांना देण्यात आले होते, तर जय भारत कन्स्ट्रक्शन उपकंत्राटदार म्हणून कार्यरत होते. ठरवून दिलेल्या गुणवत्ता निकषांनुसार डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून करारातील अटींनुसार पुढील पाच वर्षे रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशीयांनी दिली आहे.

महानगरपालिकेच्या या जलद आणि प्रभावी कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून शहरातील दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version