टँकरची संख्या वाढविण्यासह अतिरिक्त जलसाठा सुविधांची उभारणी; MIDC आणि प्रशासकीय यंत्रणांशी सातत्याने समन्वय
डोंबिवली | २ नोव्हेंबर
मुंबई महानगर प्रदेशासह (MMR) कल्याण-डोंबिवली परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रुनवाल गार्डन सिटीमधील पाणीपुरवठ्याबाबत समोर आलेल्या तक्रारींची दखल घेत रुनवाल एंटरप्रायझेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई ही केवळ रुनवाल गार्डन सिटीपुरती मर्यादित नसून, अपुरा पाऊस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लागू करण्यात आलेली पाणी कपात यामुळे संपूर्ण MMR परिसरात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी टँकरची संख्या वाढविणे, अतिरिक्त जलसाठा क्षमता निर्माण करणे आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधणे अशा विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्याची माहिती रुणवाल व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. (MMR-Wide Water Shortages Impact Runwal Garden City; Company Steps Up Measures to Ensure Uninterrupted Water Supply)
रुनवाल गार्डन सिटी ही मुंबई महानगर प्रदेशातील एकात्मिक टाउनशिप असून, रहिवाशांना आधुनिक आणि दर्जेदार जीवनशैली देण्याच्या उद्देशाने तिची उभारणी करण्यात आली आहे. टाउनशिपमध्ये उद्याने, हिरवळीच्या जागा, अंतर्गत रस्ते, पायाभूत सुविधा, दोन कार्यरत शाळा तसेच दैनंदिन गरजांसाठी किरकोळ विक्रीची दुकाने उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात MIDC कडून दर आठवड्याला ३६ तासांची पाणी कपात केली जात असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक आव्हानात्मक बनले आहे. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नियमित पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची कमतरता दिवसातील काही तासांपुरती असून, उर्वरित वेळेत पाणीपुरवठा सामान्यपणे सुरू असल्याचा दावा रुनवाल एंटरप्रायझेसने केला आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चार प्रमुख उपाययोजना…
पाणीपुरवठ्याची समस्या कमी करण्यासाठी कंपनीकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठ्याच्या स्वतंत्र पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. MIDC कडून पाणीपुरवठा सुलभ व्हावा यासाठी २.६ किलोमीटर आणि १.४ किलोमीटर लांबीच्या दोन स्वतंत्र जलवाहिन्या उभारण्यात आल्या आहेत. सामान्य परिस्थितीत टाउनशिपची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी या जलवाहिन्या पुरेशा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
याशिवाय, नियमित पाणीपुरवठ्याला पूरक व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. रहिवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी टँकरची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध राहावी, यासाठी सध्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ करून अतिरिक्त साठवण सुविधांची निर्मितीही सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित शासकीय विभाग, MIDC आणि महानगरपालिका प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून समन्वय साधला जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
कल्याण-डोंबिवली परिसरातील इतर अनेक टाउनशिप आणि स्थानिक भागांनाही सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे कंपनीने निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे या समस्येकडे व्यापक प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाचा एक भाग म्हणून पाहण्याची गरज असल्याची भूमिका रुनवाल एंटरप्रायझेसने मांडली आहे. रहिवाशांच्या सुविधांप्रती कंपनी कटिबद्ध असून, पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू राहतील. तसेच, संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.

