आमदार राजेश मोरे यांच्यासह शिवसेनेचा हल्लाबोल
डोंबिवली दि.3 डिसेंबर :
एकमेकांचे पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये घेण्यावरून काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य राजकारणात झालेला वाद शांत झाल्याचे वाटत असतानाच डोंबिवलीमध्ये आज पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये केलेल्या प्रवेशानंतर डोंबिवलीत शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच आमच्याकडे येण्यासाठी तुमच्या पक्षातील अनेक लोकं रांगेत असूनही आम्ही युती धर्माचे पालन करत असल्याचे सांगत आमदार राजेश मोरे यांनी पुन्हा एकदा युतीधर्माची आठवण करून दिली. (“We Will Not Remain Silent Either” — Shiv Sena and BJP Clash Again Over Party Poaching)
आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापर्यंत विरोधकांसोबत आपल्या मित्रपक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये या फोडाफोडीच्या राजकारणाचे पडसाद उमटले. आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांचे पक्षातील पदाधिकारी नेते न घेण्याचे दोन्ही बाजूंनी ठरवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही आज डोंबिवलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत या पक्ष प्रवेशाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
तसेच आमच्या पक्षातील पदाधिकारी – कार्यकर्त्यांना वेगवगेळी आमिषे दाखवून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महायुतीच्या विरोधात जाऊन काम करत असल्याची टीका आमदार राजेश मोरे यांनी यावेळी केली. तसेच रविंद्र चव्हाण हे 4 वेळा आमदार राहूनही त्यांना पक्ष बांधणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते घ्यावे लागणे हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. इतकेच नाही तर आम्ही युती धर्माचे पालन करत असून आमच्याकडे येण्यासाठीही तुमच्याकडील अनेक जण रांगेत आहेत. परंतू आम्हाला तसे करायचे नाहीये असे सांगत त्यांनी युतीधर्माचीही पुन्हा एकदा आठवण करून दिली.
तर डोंबिवली ही सुशिक्षित नागरिकांची नगरी असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे येथील वातावरण बिघडवत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही आतापर्यंत संयमी भूमिका घेतली असून त्यांना इतक्या वर्षांत त्यांना भाजप पक्ष मजबूत का करता आला नाही ? आमच्या कार्यकर्त्यांसोबत आमची विकासकामेही कशासाठी चोरत आहात अशा शब्दांत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी निशाणा साधला.

